सासवड पोलीस स्टेशन हद्दीत ‘कोंबिंग ऑपरेशन’; ३० हून अधिक गुन्हेगारांची झाडाझडती, आरोपींना अटक आणि दंडात्मक कारवाई
सासवड (विशेष प्रतिनिधी):
महाराष्ट्र पोलिसांच्या सासवड पोलीस स्टेशनतर्फे हद्दीतील फरारी आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्रौ ११:०० ते २९ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ०५:०० च्या दरम्यान विशेष ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवण्यात आले.
नाकाबंदी आणि गुन्हेगारांवर कारवाई
श्रीनाथ मुख्य चौकात लावण्यात आलेल्या नाकाबंदीदरम्यान गांजा विक्री करणारे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे आणि शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असलेल्या ३० पेक्षा जास्त गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. यापैकी ८ आरोपी राहत्या घरी आढळून आले. तसेच एन.बी.डब्ल्यू (NBW) वॉरंटमधील २ आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली.
वाहनांची तपासणी आणि दंड कोंबिंग ऑपरेशनदरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या ६० ते ७० लहान-मोठ्या वाहनांची कडक तपासणी करण्यात आली. यामध्ये:
ड्रंक अँड ड्राईव्ह: २ केसेस
एन.डी.पी.एस (NDPS) कन्झम्प्शन: १ केस
इतर कारवाई: १७ केसेस दाखल करून एकूण ₹१५,५००/- इतका दंड वसूल करण्यात आला.
ग्रामीण भागातही शोधमोहीम सदर कोंबिंग ऑपरेशन संपूर्ण सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत राबवण्यात आले. यामध्ये कोडीत, सुपे, नारायणपूर, गुन्होळी, भिवडी, खळद, वनपुरी आणि परींचे या गावांचा समावेश होता. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या दोन वेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या. या मोहिमेत सासवड पोलीस स्टेशनचे ६ अधिकारी, १८ अंमलदार, १ आर.सी.पी. (RCP) टीम आणि ४ पोलीस वाहनांचा ताफा तैनात होता.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्रसिंह गौर आणि पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सपोनि वैभव सोनवणे, सपोनि राऊत, पोसई गोडसे, श्रे. पोसई खंडागळे आणि पोलीस अंमलदारांनी सक्रिय सहभाग नोंदवला.








