फुरसुंगी येथे भरधाव डंपरच्या धडकेने तरुणीचा ठार; चालक घटनास्थळावरून फरार
पुणे:
पुणे-सासवड रोडवरील फुरसुंगी परिसरात एका भरधाव हायवा डंपरने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या भीषण धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. माधुरी सतीश जाधव (वय २३, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे) असे मृत तरुणीचे नाव असून, या अपघातात फिर्यादी अभिजीत ज्ञानदेव जाधव (वय ३१, रा. खराडी, पुणे) हे देखील जखमी झाले आहेत.

फिर्यादी अभिजीत जाधव आणि त्यांची मैत्रीण माधुरी जाधव हे ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९:४५ वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीने भेकराईनगर येथून मंतरवाडीकडे चालले होते. फुरसुंगी येथील ग्रीन काऊंटी फेज-२ जवळ, भोसले व्हिलेज गेटसमोर आणि पॉवर हाऊसच्या परिसरात आले असता, पाठीमागून येणाऱ्या हायवा डंपरच्या (क्रमांक MH-12-YQ-8464) चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने आणि हयगयीने चालवून त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
चालकाची पळवापळव आणि पोलिसांत गुन्हा दाखल
या अपघातात माधुरी जाधव यांचा मृत्यू झाला तर अभिजीत जाधव यांना दुखापत झाली. विशेष म्हणजे, डंपरचालक मनोहर रामदास हाके (वय २९, रा. दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) याने अपघातानंतर जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न देता तसेच पोलिसांना कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६, २८१, १२५ (अ) सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पोटवडे करीत आहेत.








