अहिल्यानगर हादरले! प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाचा खून करून मृतदेह फेकला कॅनॉलमध्ये; स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई !!


पूर्ववैमनस्य आणि प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या; एमआयडीसी पोलिसांकडून अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा उलगडा, दोन आरोपींना अटक

अहिल्यानगर:

प्रेमसंबंधाच्या संशयातून एका तरुणाची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्परतेने कारवाई करत या गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत उलगडा केला असून दोन आरोपींना अटक केली आहे.

गणेश मच्छिंद्र गायकवाड (वय ३२, रा. कमलपूर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८:३० वाजेच्या सुमारास गणेश गायकवाड हा शिंगवेनाईक (ता. जि. अहिल्यानगर) येथे आला असता, आरोपी महेश राजेंद्र जाधव आणि योगेश राजेंद्र जाधव (दोघे रा. शिंगवेनाईक) यांनी त्याला गाठून जबर मारहाण केली व त्याची हत्या केली. त्यानंतर हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी गणेशचा मृतदेह राहुरी कृषी विद्यापीठाजवळील मुळा डॅमच्या बॅक वॉटर कॅनॉलमध्ये फेकून दिला.

या प्रकरणी मृत गणेशचे भाऊ प्रदीप मच्छिंद्र गायकवाड (वय ३४, रा. कमलपूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून (गु.र.नं. ९१६/२०२६, बीएनएस कलम १०३(१), २३८, ३(५)) तपास सुरू केला.

 

गुन्ह्याचा तपास सुरू असताना एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सपोनि हेमंत थोरात यांना मुख्य आरोपी महेश राजेंद्र जाधव हा जळगाव (ता. राहाता) येथे लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

त्याच वेळी, दुसरा आरोपी योगेश राजेंद्र जाधव हा मुळा डॅम (राहुरी) परिसरात लपल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि हरीश भोये यांना मिळाली. त्यांनीही शिताफीने कारवाई करत योगेशला ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपींकडे कसून चौकशी केली असता, आरोपी महेश याच्या पत्नीशी (शुभांगी) मृत गणेशचे लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध होते. गणेश तिला भेटण्यासाठी घरी आला असता आरोपींनी त्याला पकडून मारहाण केली आणि त्याची हत्या करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून दिल्याची कबुली आरोपींनी दिली.

त्यानंतर पोलिसांनी तात्काळ राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढा परिसरात कॅनॉलमध्ये शोध मोहीम राबवून गणेश गायकवाड याचा मृतदेह शोधून काढला व नातेवाईकांकडून त्याची ओळख पटवून घेतली.

२४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना दिनांक २४/१०/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) हेमंत थोरात करत आहेत.

 

सदरची कामगिरी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मा. श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी (नगर ग्रामीण) मा. श्री. शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली:

एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन: सपोनि हेमंत थोरात, पोसई अजय कौटे, सफौ राकेश खेडकर, पोहेकॉ शैलेश रोहोकले, राजू सुद्रीक, फोलाणे, सुशांत दिवटे, पोकॉ दीपक फुंदे, नवनाथ दहिफळे, किशोर जाधव, सूरज देशमुख, अक्षय रोहोकले, मपोकॉ थोरात.

स्थानिक गुन्हे शाखा व दक्षिण मोबाईल सेल: सपोनि हरीश भोये, पोहेकॉ अरुण गांगुर्डे, राहुल द्वारके, पोकॉ सतीश भवर, सागर ससाणे, अरुण सांगळे, राहुल गुंडू यांच्या पथकाने केली आहे.


16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!