*पुण्यात वानवडी येथे वकिलावर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला; आरोपींवर कठोर कारवाई करून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्याची ॲड. तोसिफ शेख यांची मागणी*
पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट न्यायालयातून पत्नी व मुलासह घरी परतत असताना ॲड. लतीफ शेख यांच्यावर वानवडी परिसरात दिवसाढवळ्या निर्घृण हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात ॲड. लतीफ शेख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ससून रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच पुणे बार असोसिएशनच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनीही रुग्णालयात जाऊन ॲड. लतीफ शेख यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत संबंधित आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी ॲड. तोसिफ शेख यांनी ॲड. लतीफ शेख यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांना पाठिंबा व्यक्त केला. वकिलांवर अशा प्रकारे दिवसाढवळ्या हल्ले होणे ही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणाचा निष्पक्ष व सखोल तपास करून हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.
“वकील हा न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. न्यायासाठी लढणाऱ्या वकिलांनाच जर सुरक्षितता मिळत नसेल, तर ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. वकिलांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रात ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करणे ही काळाची गरज आहे. शासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन वकिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस कायदेशीर तरतुदी कराव्यात,” असे ॲड. तोसिफ शेख यांनी स्पष्ट केले.
वकिलांवरील हल्ल्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी शासन व पोलीस प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि ॲड. लतीफ शेख यांच्यावरील हल्ल्यातील दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा होण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी ॲड. तोसिफ शेख यांनी केली.









