फुरसुंगीतील एटीएम फोडणारा शातिर चोरटा फुरसुंगी पोलिसांच्या जाळ्यात; २५ सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला ठोकल्या बेड्या!


फुरसुंगीतील एटीएम फोडण्याचा सलग दोनदा प्रयत्न करणारा शातिर आरोपी फुरसुंगी पोलिसांच्या जाळ्यात!!

पुणे: फुरसुंगी परिसरातील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा आणि चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अट्टल आरोपीला फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने कौशल्याने सापळा रचून अटक केली आहे. निवृत्ती ऊर्फ अतुल बाळासो सरोदे (वय २५ ते ३० वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

काय घडली होती घटना?

दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ३:४८ वाजेच्या सुमारास फुरसुंगी गावातील एचडीएफसी बँकेच्या एटीएम मशीनमध्ये तोडफोड करून चोरीचा प्रयत्न सुरू असल्याचा कॉल कमांड सेंटर, मुंबई येथून फिर्यादीला आला. त्यानुसार फिर्यादी यांनी सकाळी जाऊन पाहणी केली असता एटीएमचे कॉस्मेटीक दरवाजा, प्रेंझेटर, शटर असेंब्ली, एस अँड जी लॉक इत्यादी गोष्टींची तोडफोड झाल्याचे दिसून आले. कमांड सेंटरकडून मिळालेल्या सीसीसीटीव्ही फुटेजमध्ये एक २५ ते ३० वयोगटातील इसम (हातात केसरी रंगाचे हँडग्लोझ, पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, तोंडाला काळा मास्क, छत्री व हातोडा घेतलेला) एटीएम फोडताना दिसला. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ६२, ३०५, ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशी झाली कारवाई:

वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार फुरसुंगी पोलीस ठाण्याचे तपास पथक प्रभारी विनोद पवार (पोलीस उपनिरीक्षक) व त्यांच्या पथकाने तत्परतेने तपास सुरू केला. रात्रीच्या वेळी घडलेली घटना असल्याने तपासाचे मोठे आव्हान होते. परंतु, पथकातील अमलबारांनी परिसरातील जवळपास २५ सीसीटीव्ही फुटेज तपासले.

फुटेजच्या आधारे संशयित इसम जवळच असलेल्या ‘महादेव सायकल अँड गॅरेज’ या दुकानामध्ये जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

दोन गुन्ह्यांचा उलगडा:

तपासादरम्यान आरोपीने यापूर्वीही याच एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न केला असल्याचे उघडकीस आले. पोलीस ठाण्यातील अभिलेख तपासले असता त्याच्याविरुद्ध पूर्वीचा गुन्हा (गु.र.नं.२०२/२०२६) दाखल असल्याचे आढळले. अशाप्रकारे फुरसुंगी पोलिसांनी एटीएम फोडीच्या सलग दोन गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले हँडग्लोझ, हातोडी आणि मास्क हस्तगत करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार नितीन सोनवणे करत आहेत.

ही कामगिरी मा. जीवन बेनीवाल (पोलीस उपआयुक्त, परि-६), मा. अनुराधा उदमले (सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणीकाळभोर विभाग), आणि अमोल मोरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन) व राजेश खांडे (पोलीस निरीक्षक – गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तपास पथकातील पोउपनि विनोद पवार, पोलीस हवा. नितीन गायकवाड, सागर कणसे, श्रीनाथ जाधव, आनंद पाठोळे, पोलीस अंमलदार हेमंत कामथे, अभिजीत टिळेकर, नितीन सोनवणे आणि गणेश शिंदे या सर्व कर्मचाऱ्यांनी ही प्रशंसनीय कामगिरी केली.


16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!