खडक पोलीस स्टेशनची धडक कारवाई: १०० हून अधिक CCTV फुटेज तपासून बुलेट चोरणाऱ्याला ४८ तासांत ठोकल्या मुसक्या
पुणे (प्रतिनिधी):
रविवार पेठ परिसरातून बुलेट दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला खडक पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने ४८ तासांच्या आत अत्यंत कौशल्याने तपास करत जेरबंद केले आहे. या कारवाईत चोरीला गेलेली ३० हजार रुपये किमतीची बुलेट दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नक्की काय घडले होते?
दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २१:३० ते २३:३० वाजेच्या सुमारास भवरी आळी, रविवार पेठ येथील मोहन मेटल वर्क्सजवळ सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेली बुलेट दुचाकी अज्ञात चोराने लांबवली होती. याप्रकरणी फिर्यादी यांनी १९ सप्टेंबर २०२६ रोजी तक्रार नोंदवल्यानंतर खडक पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
१०० पेक्षा जास्त CCTV आणि तांत्रिक विश्लेषण ठरले महत्त्वाचे:
गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने परिसरातील तसेच आजूबाजूच्या भागांतील १०० पेक्षा जास्त सी.सी.टी.व्ही. (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा शोध सुरू असताना, पोलीस अंमलदार मयुर भोसले आणि उमेश मठपती यांना बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्हा शुभम पोतदार याने केल्याचे निष्पन्न झाले.
उंड्री परिसरातून आरोपीला अटक:
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी उंड्री परिसरात धाड टाकून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव शुभम अशोक पोतदार (वय २९ वर्षे, रा. येळवी, ता. जत, जि. सांगली) असल्याचे सांगितले. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यास २३ सप्टेंबर २०२६ रोजी अटक करून त्याच्याकडून चोरी केलेली ३०,००० रुपये किमतीची बुलेट हस्तगत केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई:
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-१) कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त (फरासखाना विभाग) सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) समाधान पवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जहाड, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, राहुल मखरे, विनोद शिंदे तसेच पोलीस अंमलदार मयुर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, निलेश साबळे, उमेश मठपती, सैपुनमुलुख नदाफ आणि विकास पांडोळे यांच्या पथकाने केली आहे.









