
पुणे:
लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या खुनाच्या प्रयत्नांच्या गंभीर गुन्ह्यात मागील दीड वर्षांपासून फरारी असलेल्या मुख्य आरोपीला गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. साहिल आनंद सकट (वय २१, रा. घोरपडी वस्ती, इंदिरा नगर, लोणी काळभोर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ६ चे पथक लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत गस्त घाजत होते. यादरम्यान युनिट ६ कडील पोलीस अंमलदार संतोष राठोड व अक्षय बांदल यांना एका गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील (गु.र.नं. १०३/२०२५, भा.न्या.सं. कलम १०९, ११५(१), ११७(२), १११८(२), २९९, ३५१(२), ३(५) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) प्रमाणे) फरारी असलेला आरोपी साहिल सकट हा त्याच्या घराजवळ आला आहे.
या माहितीची खात्री करून युनिट ६ च्या पथकाने तात्काळ सापळा रचून आरोपी साहिल आनंद सकट यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची नियमानुसार वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) व सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनखाली, गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष शेटे यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव, सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर शिर्के, पोलीस हवालदार नानासाहेब मोरे, अमित सस्ते, तसेच पोलीस अंमलदार अक्षय बांदल व संतोष राठोड यांच्या पथकाने पार पाडली आहे..








