१००% पेक्षा जास्त मुद्देमाल हस्तगत! खडक पोलीस स्टेशनच्या पथकाकडून घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांत यशस्वी छडा !


२ कोटी २० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची घरफोडी: खडक पोलिसांकडून अवघ्या १२ तासांत तपास; २ आरोपींना अटक

पुणे:

रविवार पेठ परिसरात घडलेल्या तब्बल २ किलो २०० ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिने आणि बिस्किटांच्या चोरीचा छडा खडक पोलीस स्टेशनच्या पथकाने लावला आहे. अवघ्या १२ तासांच्या आत कौशल्यपूर्ण तपास करत पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्याकडून १०० टक्क्यांपेक्षा जास्त मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

 

 

फिर्यादी हे सोन्याचे दागिने बनवण्याचे व्यावसायिक असून विविध सोनार त्यांना दागिने बनवण्यासाठी देत असतात. दिनांक १०/१०/२०२६ रोजी फिर्यादी व त्यांची पत्नी घरी नसताना, अज्ञाताने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले २ कोटी २० लाख रुपये किमतीचे २ किलो २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व बिस्किटे चोरून नेली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. ५५३/२०२६, बी.एन.एस. कलम ३०५(अ), ३३१(३), ३(५)) दाखल करण्यात आला होता.

 

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करण्यात आली. तपास पथकातील पोलीस अंमलदार हेमंत पेरणे, अमित जमदाडे, मयुर भोसले आणि सैफ नदाफ यांना फिर्यादीच्या घराखाली दोन संशयित इसम घुटमळताना दिसले.

गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला असता, हे दोघे संशयित फिर्यादी राहत असलेल्या इमारतीतच राहत असल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत खालील दोन आरोपींना ताब्यात घेतले:

१. मुस्तफा नजिर शेख (वय ३६ वर्षे, रा. १६१, के. जी. एन. कॉम्प्लेक्स, पहिला मजला, रविवार पेठ, पुणे)

२. सरफराज उर्फ आवेज मैन्नुद्दीन शेख (वय २२ वर्षे, रा. १६१, रविवार पेठ, काच आळी, पुणे)

हे दोघे आरोपी एकमेकांचे नातेवाईक असून चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली.

१००% पेक्षा जास्त मुद्देमाल हस्तगत:अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात चोरलेला २ किलो २०० ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुद्देमाल आणि बिस्किटे पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आली. याव्यतिरिक्त अधिकचे ४६ ग्रॅम सोने देखील हस्तगत करण्यात आले आहे. हस्तगत केलेल्या एकूण सोन्याची किमत २ कोटी २४ लाख ८६२ रुपये इतकी आहे.

 

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त (परि-१) श्री. कृषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त (फरासखाना विभाग) श्री. सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. धनंजय पिंगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती शर्मिला सुतार, श्रेणी पो.उ.नि. राहुल मखरे, पो.उ.नि. जयसिंग दाढे, अशोक खाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष मोहिते, विनोद शिंदे आणि पोलीस अंमलदार मयुर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, निलेश साबळे, विकास पांडोळे, सैफ नदाफ, उमेश मठपती व सागर कुडले यांच्या पथकाने केली आहे.


16
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!