हडपसरमध्ये ५०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; महापालिका शाळेच्या प्रांगणातील आग्या मधमाश्यांच्या पोळ्यामुळे मुले जखमी!
काही विद्यार्थ्यांवर आधीच मधमाश्यांचा हल्ला; तरीही शाळा प्रशासन सुस्तावलेलेच
‘क्रांती शेतकरी संघटने’चा पालिका व अग्निशामक दलाला कारवाईचा थेट इशारा
हडपसर (पुणे):
पुणे महानगरपालिकेच्या साडेसतरा नळी येथील प्राथमिक शाळेतील ४०० ते ५०० हून अधिक निष्पाप विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेच्या प्रांगणातील झाडावर आग्या मधमाश्यांचे मोठे पोळे तयार झाले असून, या मधमाश्यांनी हल्ला केल्याने काही लहान विद्यार्थी जखमी झाले आहेत. इतकी गंभीर घटना घडल्यानंतरही शाळा प्रशासन व मुख्याध्यापकांनी कोणतीही उपाययोजना न केल्याने पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी ‘क्रांती शेतकरी संघटने’चे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी हडपसर प्रभाग समिती, सहाय्यक आयुक्त (हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालय), शिक्षण विभाग आणि अग्निशामक दलाला निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
साडेसतरा नळी येथील पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीचे साधारण ४०० ते ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सर्वसामान्य व गरीब कुटुंबांतील ही मुले दिवसभर शाळेच्या प्रांगणात खेळतात व वावरतात. याच प्रांगणातील एका झाडावर आग्या मधमाश्यांनी मोठे पोळे तयार केले आहे. काही दिवसांपूर्वी या मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्यामुळे काही चिमुरडे विद्यार्थी जखमी झाले आहेत.
प्रशासकीय संवेदनहीनतेचा कळस!
मुले जखमी झाल्यानंतरही शाळा प्रशासनाला जाग आलेली नाही. मुख्याध्यापकांनी या घटनेची गंभीर दखल न घेता अग्निशामक दल किंवा संबंधित पालिका विभागाला कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही, असा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
“आज काही मुले जखमी झाली आहेत, पण उद्या जर या मधमाश्यांमुळे एखाद्या निष्पाप बालकाच्या जिवाचे बरे-वाईट झाले, तर याला जबाबदार कोण? त्या गरीब माता-पित्यांच्या आक्रोशाला उत्तर देण्याची ताकद या प्रशासनात आहे का?”
— अमोल नाना तुपे (संस्थापक अध्यक्ष, क्रांती शेतकरी संघटना)
अग्निशामक दलाने तातडीने पोळे हटवण्याची मागणी
कोणत्याही मोठ्या दुर्घटनेची किंवा जिवाचे नुकसान होण्याची वाट न पाहता हडपसर फायर स्टेशन व महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने योग्य त्या सुरक्षेच्या उपाययोजना करून हे आग्या मधमाश्यांचे पोळे हटवावे, अशी आक्रमक मागणी क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही क्रांती शेतकरी संघटना चे संस्थापक अध्यक्ष मा.अमोल नाना तुपे यांनी दिला आहे









