पुणे : ‘नारी शक्ती’चा गजर करणाऱ्या पुण्यातील भाजपाचे पदाधिकारी धीरज रामचंद्र घाटे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर येथील सभागृहात, सर्वसामान्य नागरिक आणि लाईव्ह मीडियासमोर त्यांनी स्वारगेट येथील गुन्हा क्रमांक ९१/२०२६ मधील पीडित महिलेचे नाव सार्वजनिकपणे उच्चारल्याचा आरोप आहे.
भारतीय न्याय संहिता, २०२३ नुसार पीडित महिलेची ओळख उघड करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असताना देखील संबंधित आरोपीने हे कृत्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. एवढ्यावरच न थांबता, स्वतःचा प्रचार करण्याच्या उद्देशाने पीडितेचे नाव असलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते फेसबुकसह विविध सोशल मीडियावर प्रसारित केल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणी स्वाती गायकवाड यांनी ॲड. तोसिफ शेख यांच्या माध्यमातून भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आरोपीवर तात्काळ कारवाई करून अटक करण्यात यावी, अन्यथा पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.








