
गोपाळपट्टी येथे गॅरेज चालकांकडून फुटपाथवर अतिक्रमण; हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त
मांजरी / हडपसर:
गोपाळपट्टी परिसरातील झेड. पी. शाळा आणि साधना बँकेच्या समोरील मुख्य मांजरी रस्त्यावर असणाऱ्या फुटपाथवर गॅरेज चालकांनी बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. दुरुस्तीसाठी येणाऱ्या दुचाकी गाड्या थेट फुटपाथवर पार्क केल्या जात असल्याने पादचाऱ्यांसाठी असलेला मार्ग पूर्णपणे बंद झाला असून, हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या ढिम्म कारभारामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे.
पादचाऱ्यांच्या जीवाला धोका……
गोपाळपट्टी येथील ‘न्यू साई कृपा सर्व्हिस सेंटर’ आणि ‘साईकृपा स्पेअर्स अँड सर्व्हिस सेंटर’ (रेसर स्टेशन) यांसारख्या गॅरेजबाहेर मोठ्या प्रमाणावर दुचाकी गाड्या फुटपाथवर उभ्या केल्या जातात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मुख्य रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत असल्याने अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
हडपसर मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे दुर्लक्ष
या अतिक्रमणाबाबत स्थानिक नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण नियंत्रण पथक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने गॅरेज चालकांचे धाडस वाढले आहे.
कारवाईची तीव्र मागणी,….
फुटपाथ हा केवळ पादचाऱ्यांच्या वापरासाठी असून तो तात्काळ मोकळा करण्यात यावा. हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाने या बेकायदेशीर अतिक्रमणावर धडक कारवाई करून रस्ता पादचाऱ्यांसाठी सुरक्षित करावा, अशी आक्रमक मागणी परिसरातील रहिवासी व पादचाऱ्यांकडून केली जात आहे.








