“उपचाराच्या नावाखाली लूट! पुण्यातील खाजगी रुग्णालयांवर गंभीर आरोप” “रुग्णांना वेठीस धरून वसुली; खाजगी हॉस्पिटल्सविरोधात संताप उसळला”


पुण्यात खाजगी रुग्णालयांची सामान्य जनतेची‘लूटमार’ उघड; कारवाईची जोरदार मागणी. क्रांती शेतकरी संघटना अध्यक्ष अमोल नाना तुपे.

पुणे : शहर व जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. उपचारांच्या नावाखाली अवाजवी बिल आकारणी, पारदर्शकतेचा अभाव आणि रुग्णांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष अमोल (नाना) यशवंत तुपे यांनी राज्य सरकार, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल तसेच पुणे महानगरपालिकेकडे लेखी तक्रार करत तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, अनेक रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थितीतही रुग्णांना दाखल करण्यापूर्वी मोठ्या रकमेचे ‘डिपॉझिट’ मागितले जाते. उपचारांचे अधिकृत दर (टॅरिफ बोर्ड) न लावणे, शासकीय आरोग्य योजनांकडे दुर्लक्ष करणे आणि औषधे व वैद्यकीय साहित्यावर प्रचंड नफेखोरी करणे, असे प्रकार सर्रास सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, काही ठिकाणी बिलाची संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास नकार दिला जात असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. “ही पद्धत अत्यंत अमानुष असून, माणुसकीला काळीमा फासणारी आहे,” असे क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी म्हटले आहे.

मेडिक्लेम असलेल्या रुग्णांच्या बाबतीतही अधिक बिल आकारून संपूर्ण विमा रक्कम खर्च करण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनावश्यक तपासण्या, आयसीयूचा मुक्काम वाढवणे आणि महागडी औषधे लादणे यामुळे रुग्ण आर्थिक संकटात सापडत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या पार्श्वभूमीवर, खाजगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट करण्यासाठी विशेष समिती स्थापन करावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांचे परवाने रद्द करावेत आणि संबंधितांवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, रुग्णालयांमध्ये वाढत्या तणावामुळे नातेवाईकांकडून होणाऱ्या तोडफोडीच्या घटनांबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली असून, “हिंसा कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही; मात्र अशा संतप्त प्रतिक्रिया का उमटतात, याचे आत्मपरीक्षण सरकार व रुग्णालय प्रशासनाने करणे गरजेचे आहे,” असेही क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी स्पष्ट केले.

शासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन ठोस कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरेल, असा इशाराही क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने  यावेळी देण्यात आला आहे.


10
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!