मित्रांनीच केला मित्राचा घात! काळेपडळ पोलिसांनी ४८ तासांच्या आत आरोपींच्या ठोकल्या बेड्या
पुणे:
मित्रांनीच आपल्याच एका मित्राचा निर्घृणपणे जीव घेतल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात उघडकीस आली आहे. मात्र, काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या ४८ तासांच्या आत सर्व आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
तपास पथकाचे पोलिस हवालदार शाहिद शेख व दाऊद सय्यद यांना मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे आरोपी अटक
काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आकाश मारुती झांबरे (वय ३१ वर्षे, रा. झांबरे तालीम चौक, गणेश मंदिराशेजारी, होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) या युवकाचा अज्ञात कारणावरून, अज्ञात इसमाने डोक्यात व तोंडावर गंभीर वार करून जिवे ठार मारले होते. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गु.रजि.क्र. २७३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला एका संशयित इसमाला ताब्यात घेतले. त्याचे नाव आकाश ऊर्फ आक्या अशोक भरेकर असे आहे. त्याच्याकडे पोलिसी खाक्या दाखवत अधिक चौकशी केली असता, हा खून त्याने आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनी मिळून केल्याची कबुली दिली.
या गुन्ह्यात त्याचे साथीदार संतोष बबन टकले आणि साहिल अर्जुन कचरावत (दोघे रा. हांडेवाडी, पुणे) हे सामील होते आणि गुन्हा केल्यापासून ते फरार झाले होते.
बोपदेवघाटाच्या दिशेने पळताना फिल्मी स्टाईलने पाठलाग
आज (दि. २३ जून) तपास पथकातील तांत्रिक विश्लेषक फरार आरोपींच्या मोबाईल क्रमांकांचे विश्लेषण करत होते. दरम्यान, पोलीस हवालदार दाऊद सय्यद यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, फरार आरोपी संतोष टकले आणि साहिल कचरावत हे येवलेवाडी परिसरात आले असून तिथून पळून जाण्याच्या तयारीत आहेत.
माहिती मिळताच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार तातडीने येवलेवाडी येथे पोहोचले. मात्र, आरोपी एका रिक्षामध्ये बसून बोपदेवघाटाच्या दिशेने पळून गेल्याचे समजले. पोलिसांनी वेळ न दवडता आरोपींचा पाठलाग केला आणि बोपदेवघाटाच्या दिशेने सापळा रचून अत्यंत शिताफीने दोन्ही फरार आरोपींना ताब्यात घेतले.
या पथकाने केली उल्लेखनीय कामगिरी
सदरची यशस्वी कामगिरी पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त श्री. संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ६) श्री. जीवन बेनिवाल, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (हडपसर विभाग) श्री. अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच, काळेपडळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) आण्णासो बाबर यांच्या सूचनेनुसार: तपासी अधिकारी: सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुतार तपास पथक प्रमुख: सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली,..
अंमलदार व पथक: पोलीस हवालदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, विशाल पंधरकर, प्रतिक लाहीगुडे, शाहीद शेख, किशोर पोटे, अमोल फडतरे, निलेश देसाई, अतुल ठोंबरे, लक्ष्मण काळे, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे आणि अमोल जाधव यांच्या पथकाने ही प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे









