हडपसर मध्ये अतिक्रमण कारवाईदरम्यान मोठा गोंधळ; महिलेने जप्त माल परत घेण्यासाठी गाडीवर चढून घेतला ताबा !!


हडपसरमध्ये अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; महिलेकडून कर्मचाऱ्यांना दमदाटी, गाडीवर चढून जप्त माल घेण्याचा प्रयत्न!!

 

पुणे : हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने मंत्री मार्केट परिसरातील गाडीतळ रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यावर अनधिकृतपणे व्यवसाय करणारे भाजीविक्रेते, चप्पल विक्रेते तसेच इतर फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारीनंतर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली.

 

कारवाईदरम्यान अतिक्रमण विभागाने काही विक्रेत्यांचा माल जप्त केला. यावेळी एका महिलेने संतप्त होत जप्त केलेला माल परत घेण्यासाठी थेट महापालिकेच्या गाडीवर चढून गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित महिलेने गाडीचा ताबा घेण्याचाही प्रयत्न केला तसेच कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात कारवाईत अडथळा निर्माण केल्याचे सांगितले जात आहे.

 

इतकेच नव्हे तर संबंधित महिलेने अधिकारी व कर्मचाऱ्यांना असभ्य भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केल्याचाही आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

 

मंत्री मार्केट आणि गाडीतळ परिसरात अनेक अनधिकृत विक्रेत्यांनी रस्त्यावरच व्यवसाय थाटल्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी जागा उरत नसून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली असल्याचे सांगण्यात आले.

 

दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून भविष्यातही अशा प्रकारच्या अनधिकृत व्यवसायांवर कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, सार्वजनिक रस्ते मोकळे ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!