पुण्याच्या मानसी यादवची कनिष्ठ राष्ट्रीय एथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकाला गवसणी!
हवेली / पुणे:
तामिळनाडू येथील चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पार पडलेल्या २० वर्षांखालील कनिष्ठ राष्ट्रीय एथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पुण्याच्या मानसी अविनाश यादव हिने अप्रतिम कामगिरी करत राज्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानास्पद यश मिळवले आहे. मानसीने महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक, तर ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावून दुहेरी मुसंडी मारली.
३ हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत तब्बल २२ खेळाडूंमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली. या स्पर्धेत मानसीने अत्यंत जिद्द आणि चिकाटी दाखवत उत्तर प्रदेशच्या वर्षा हिला मागे टाकले. मानसीने १० मिनिटे ५४.३५ सेकंद अशी उत्कृष्ट वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. यानंतर झालेल्या ३००० मीटर धावण्याच्या शर्यतीतही तिने सहज आणि प्रभावी प्रदर्शन करत रौप्यपदकाची कमाई केली.
कठोर मेहनत आणि दर्जेदार प्रशिक्षणाचे फळ
लोणीकंद (ता. हवेली) येथील रहिवासी असलेली मानसी यादव ही बीजेएस महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. ती सणस मैदानावर शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू आणि प्रशिक्षक यमुना लडकत यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करते. तिच्या या यशामागे कठोर परिश्रम, जिद्द, सातत्यपूर्ण सराव आणि कुटुंबाचे भक्कम पाठबळ यांचा मोठा वाटा आहे.
“या यशासाठी मी खूप मेहनत घेतली होती. भविष्यात देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकून देणे हेच माझे ध्येय आहे. प्रशिक्षक आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच हे यश शक्य झाले.”
—









