“सकारात्मक प्रशासन” मोहिमेची पुण्यात सुरुवात; प्रशासन-पत्रकारांमध्ये संवाद वाढवण्यावर भर
पुणे : अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मा. राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रीय उपाध्यक्ष मा. ॲड. अमोल पाटील यांच्या संकल्पनेतून “सकारात्मक प्रशासन” ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रशासन आणि पत्रकार यांच्यात सकारात्मक संवाद निर्माण करून प्रशासनाच्या चांगल्या व विधायक कामांची माहिती समाजापर्यंत पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
या मोहिमेची सुरुवात “सकारात्मक पुणे” या उपक्रमातून करण्यात आली. अलीकडील काळात ड्रग्स, गुन्हेगारी तसेच इतर विविध कारणांमुळे पुण्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नकारात्मक प्रतिमा तयार होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुण्याची सामाजिक व सांस्कृतिक प्रतिमा मलिन होत असून त्याचा थेट परिणाम शहराच्या आर्थिक व शैक्षणिक प्रगतीवर होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर पुण्याची सकारात्मक प्रतिमा समाजासमोर मांडण्यासाठी तसेच प्रशासनाच्या चांगल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या अंतर्गत आज हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पुणे महानगरपालिका हडपसर विभागाचे उपायुक्त मा. रवी खंदारे तसेच काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. मानसिंग पाटील यांची भेट घेण्यात आली. या उपक्रमाचे पोलीस प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले असून या मोहिमेला विशेष सहकार्य करण्याची तयारीही व्यक्त करण्यात आली.
यावेळी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष मा. ॲड. अमोल पाटील, नूतन शहराध्यक्ष मा. विजय रणदिवे, शहराध्यक्ष मा. महेश टेळे पाटील, सरचिटणीस मा. मुकेश वाडकर तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.









