सासवड:
सासवड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि तलवार बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून ७ लाख ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी सासवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) शंकर राऊत यांना गुप्त माहिती मिळाली की, शुभम राजपुरे (रा. मोरया सोसायटी, ता. पुरंदर, जि. पुणे) हा त्याच्या कारमधून पिस्तूल घेऊन जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून मोरया सोसायटी परिसरात सापळा रचला.
आरोपी ताब्यात आल्यानंतर पंचांच्या समक्ष त्याच्या मारुती सुझुकी ब्रेझा गाडीची (क्रमांक MH 12 TN 8530) झडती घेण्यात आली. गाडीच्या डॅशबोर्डखालील कप्प्यात एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन मॅगझिन, ७ जिवंत काडतुसे आणि एक ३ फूट लांबीची तलवार मिळून आली. पोलिसांनी तातडीने जप्तीची कारवाई करून आरोपीस अटक केली.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण किंमत ₹७,६६,०००/-):
गावठी पिस्तूल: स्टील लोखंडी बॉडीचे पिस्तूल (किंमत ₹६०,०००/-)
मॅगझिन: २ मॅगझिन (किंमत ₹१,०००/-)
जिवंत काडतुसे: ७ जिवंत राउंड (KF 7.65 mm) (किंमत ₹३,५००/-)
तलवार: ३ फूट लांबीची पितळी मुठ असलेली तलवार (किंमत ₹२,०००/-)
चारचाकी गाडी: पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी ब्रेझा कार (किंमत ₹७,००,०००/-)
आरोपीवर १६ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल
अटक करण्यात आलेला आरोपी शुभम राजपुरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी भादंवि कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३२४, ३२३, ३५४, ३०२ तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत सासवड व इतर पोलीस ठाण्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सासवड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गु.र.क्र. ४८७/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक (बारामती) गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक (पुणे) शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी (भोर) राजेंद्रसिंह गौर आणि सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सपोनि शंकर राऊत, पोहवा दत्तात्रय काळे, पोहवा विशाल जाधव, महिला पोहवा भुजबळ, पोना गोकुळ हिप्परकर, पोकॉ तुषार लोंढे, पोकॉ प्रविण शेंडे, पोकॉ चिले, पोकॉ किवले व पोशि शिवतरे यांनी सहभाग घेतला.
प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत करत आहेत.









