हडपसर गाडीतळ परिसरातील पी.एम.टी. इमारतीबाहेर दुकानदारांचे मोठे अतिक्रमण; पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील



हडपसर (प्रतिनिधी):
हडपसर येथील मुख्य व गजबजलेल्या गाडीतळ परिसरातील पी.एम.टी. (P.M.T.) इमारतीबाहेर दुकानदारांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. दुकानाच्या सीमा ओलांडून रस्ता व पदपथावरच साहित्य मांडल्याने नागरिकांना आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला असून, तात्काळ कारवाई करण्याची जोरदार मागणी स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे.
हडपसर गाडीतळ हे पुणे शहरासह उरुळी कांचन, सासवड, सोलापूर रस्ता आणि इतर उपनगरांना जोडणारे अत्यंत महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे. दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांची येथे मोठी वर्दळ असते. पी.एम.टी. इमारतीच्या आसपास असलेल्या अनेक दुकानदारांनी आपले सामान दुकानाबाहेर रस्त्यावर आणि फुटपाथवर लावून ठेवले आहे. यामुळे मूळ पदपथ गायब झाले असून, नागरिकांना थेट मुख्य रस्त्यावरूनच जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
अपघाताचा मोठा धोका आणि वाहतूक कोंडी*
पादचारी रस्त्यावरून चालत असल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका कमालीचा वाढला आहे. त्यातच गाडीतळ परिसरात एसटी, पीएमपीएमएल बस आणि खासगी वाहनांची नेहमीच मोठी गर्दी असते. अतिक्रमाणामुळे पदपथ बंद झाल्याने वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांचे प्रचंड हाल होत आहेत.
प्रशासनाचे दुर्लक्ष; कठोर कारवाईची मागणी
याबाबत महापालिका प्रशासन आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. कधीतरी नाममात्र कारवाई केली जाते, परंतु पथक निघून जाताच पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती निर्माण होते. महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी या वाढत्या अतिक्रमाणावर बुलडोझर चालवून रस्ता व पदपथ मोकळा करावा, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.









