
हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाची अतिक्रमणविरोधी धडक कारवाई; विनापरवाना विक्रेते, अवैध रिक्षा आणि मनमानी करणाऱ्या पीएमपीएमएलवर नागरिकांचा रोष!!
पुणे:
हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागामार्फत हडपसर व मांजरी परिसरामध्ये विनापरवाना, रस्त्यांवर ताबा मिळवून बसणारे फळ विक्रेते, भाजीवाले आणि पथारी धारकांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे काही प्रमाणात रस्ते मोकळे झाले असले, तरी परिसरातील वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षितता अद्यापही धोक्यात असल्याचा तीव्र सूर उमटत आहे.
मुख्य रस्त्यांवर आणि प्रत्येक चौकात अनधिकृतपणे उभे राहणारे रिक्षावाले अवैधरित्या प्रवासी वाहतूक करत असल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. त्यातच भररस्त्यात अतिक्रमण करून बसणाऱ्या विक्रेत्यांमुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही. शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या अनागोंदी कारभारामुळे नित्यनेमाने मनस्ताप सहन करावा लागत असून, वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या साऱ्यांत भर म्हणून पी.एम.पी.एम.एल. (PMPML) बसचालकांची बेपर्वा व मनमानी नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. अनेक ठिकाणी बसचालक रहदारीचे नियम धाब्यावर बसवून सिग्नल न पाळता भरधाव वेगात गाड्या चालवतात. तसेच, कुठल्याही अधिकृत थांब्याची पर्वा न करता मनाला येईल तिथे मध्य रस्त्यात बस थांबवून प्रवाशांची चढ-उतार केली जाते. या बेशिस्त वाहनचालकांमुळे आजवर कित्येक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर अनेकांना गंभीर अपघातात आपले पाय गमवून कायमचे अपंगत्व आले आहे.
प्रशासनाने केवळ दिखाऊ कारवाई न करता, चौकाचौकात बस्तान मांडणाऱ्या अवैध रिक्षांवर कायमस्वरूपी चाप लावावा आणि नियमांची पायमल्ली करणाऱ्या पीएमपीएमएल चालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांमधून केली जात आहे.









