पुणे शहराचा कचरा उचलणाऱ्या कंपनीच्या शेजारीच कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त!!!!
आकाशवाणी–आनंदनगर परिसरात जुना बेबी कॅनल बंद असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, Serum Institute of India यांच्या कंपनीच्या शेजारीच कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. पुणे शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी लाखो रुपये खर्च केले जात असताना, त्याच कंपनीलगत कचरा का उचलला जात नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कॅनलमध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून डास व रोगराईचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. यासोबतच कॅनलवरील जाण्या-येण्याचा रस्ता पूर्णतः खराब झाला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. विशेषतः महिलांना ये-जा करताना खड्डे टाळताना अनेकदा पडण्याच्या घटना घडल्या असून काही महिला जखमी झाल्या आहेत. कॅनललगत कोणतीही सुरक्षा जाळी नसल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.
हडपसर क्षेत्रीय कार्यालय व संबंधित पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. शहराचा कचरा उचलणाऱ्या व्यवस्थेच्या शेजारीच कचऱ्याचे ढीग साचणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल नाना तुपे यांच्यासमोर नागरिकांनी आपली व्यथा मांडत तातडीने कॅनल साफसफाई, रस्त्याची दुरुस्ती व सुरक्षा जाळी बसविण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
“शहर स्वच्छतेचे दावे एकीकडे, आणि प्रत्यक्षात कंपनी शेजारीच कचऱ्याचे साम्राज्य दुसरीकडे,” अशी प्रतिक्रिया देत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.









