काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवैध गांजा विक्री व पुरवठा करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा पर्दाफाश; ९.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे (प्रतिनिधी):
काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने धडाकेबाज कामगिरी करत अवैध गांजा विक्री आणि पुरवठा करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ९,२७,३७७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नक्की काय घडले?
दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी काळेपडळ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व अमंलदार हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे, महादेव शिंदे, नितीन ढोले व गिरीराज जगदाळे यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, एस.आर.पी.एफ.च्या मोकळ्या मैदानात झाडाजवळ एक इसम संशयितरीत्या पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन उभा आहे व त्याच्याकडे गांजा असण्याची शक्यता आहे.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या सूचनेनुसार सपोनि अमित शेटे, सपोनि रत्नदिप गायकवाड आणि पोलीस स्टाफने पंचांसह तात्काळ छापा टाकला. तेथे योगेश प्रल्हाद अडसुळ (वय ४० वर्षे, रा. काळेपडळ, हडपसर) याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे १०९४ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.
गांजा पुरवठादार जाळ्यात!
दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना, योगेश अडसुळ याला गांजाचा पुरवठा करणाऱ्या इतर ५ सराईत आरोपींना पोलिसांनी अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१. विजय राजु हुबळीकर (वय २९ वर्षे)
२. बबन बाबुराव दांडगे (वय ३९ वर्षे)
३. अशोक उर्फ अक्षय सतीश जाधव (वय २८ वर्षे)
४. साहिल सुभाष ठोंबरे (वय २७ वर्षे)
५. विकास संदिप बोडडे (वय २० वर्षे)
या आरोपींकडून ८,५५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल, ज्यामध्ये एक चारचाकी कार आणि आरोपींचे मोबाईल फोन यांचा समावेश आहे, जप्त करण्यात आला.
सराईत गुन्हेगार आणि गंभीर गुन्हे
अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या रेकॉर्डची पाहणी केली असता, त्यांच्यावर कोथरूड, यवत, वानवडी, नगर तालुका, भिंगार पोलीस ठाणे येथे खून, खुनाचा प्रयत्न करणे आणि एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सह. पोलीस निरीक्षक अमित शेटे करत आहेत.
कारवाई करणारे पोलीस पथक
ही यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त जीवन बेनीवाल, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ६) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे (हडपसर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अण्णासो बाबर, सपोनि रत्नदिप गायकवाड, सपोनि अमित शेटे, सपोफौ. राजस शेख, तसेच पोलीस अंमलदार प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, दाऊद सय्यद, प्रतीक लाहगुडे, शाहिद शेख, निलेश देसाई, विशाल ठोंबरे, अतुल पंथरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदिप बेडीस्कर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे व अमोल जाधव यांच्या पथकाने केली.









