भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून वाहन चोरीचे ३ गुन्हे उघड; २ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त!
पुणे:
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका विधीसंघर्षग्रस्त (अल्पवयीन) बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून वाहन चोरीचे तब्बल ३ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून २ दुचाकी आणि १ तीन चाकी रिक्षा, असा एकूण २,३५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी आणि अंमलदार हद्दीत वाहन चोरांचा शोध घेत होते. दरम्यान, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे आणि अभिनय चौधरी यांना एक महत्त्वाची व खात्रीशीर माहिती मिळाली. वंडरसिटी रोडवरील एका मोकळ्या जागेत एक अल्पवयीन मुलगा चोरीची रिक्षा आणि दुचाकी पार्क करून थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ वंडरसिटी रोडकडून सावंत विहारकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. तिथे संशयित विधीसंघर्षग्रस्त बालक एका रिक्षा (क्र. MH12.QR.3784) आणि एक डियो दुचाकी (क्र. MH12QQ7182) या दोन वाहनांसह आढळून आला. पोलिसांनी त्या वाहनांबाबत अधिक चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने ही वाहने चोरी केल्याची कबुली दिली.
अजून एक गुन्हासह एकूण ३ गुन्हे उघड:
पोलिसांनी त्याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळून आणखी एक होंडा शाईन दुचाकी (क्र. MH12KZ6111) चोरी केल्याचे मान्य केले. या कारवाईमुळे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील खालील ३ गुन्हे उघडकीस आले आहेत:
गुन्हा क्र. ३१८/२०२६ (BNS कलम ३०३(२)): तीन चाकी रिक्षा (MH12.QR.3784) – किंमत ₹१,००,०००/-
गुन्हा क्र. ३१९/२०२६ (BNS कलम ३०३(२)): डियो दुचाकी (MH12QQ7182) – किंमत ₹६५,०००/-
गुन्हा क्र. ४७४/२०२५ (BNS कलम ३०३(२)): शाईन दुचाकी (MH12KZ6111) – किंमत ₹७०,०००/-
एकूण जप्त मुद्देमाल: २ लाख ३५ हजार रुपये किंमतीची ३ वाहने पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
सदरची धडाकेबाज कामगिरी पोलीस उप आयुक्त (परिमंडळ २) मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसेच पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार आणि संदीप आगळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.









