पुणे:
जमीन खरेदीखत करून घेतलेल्या क्षेत्राची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला अडवून, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत थेट अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी हडपसर येथील रहिवासी श्री. रोहित शिवाजी मोडक (वय ४०, रा. इंद्र हाईट्स, हडपसर) यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध कायदेशीर आणि कडक कारवाई करण्यासाठी रीतसर तक्रार अर्ज दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रोहित मोडक यांनी वाघोली-लोणीकंद परिसरातील शेतजमीन गट क्र. ५४ मधील जमीन मूळ मालक अजित शांताराम साळुंके यांच्याकडून कायदेशीर व्यवहार करून खरेदी केली आहे. या जमिनीचा वकिलांमार्फत मागील ५० वर्षांचा क्लिअर टायटल सर्च रिपोर्ट काढून, दि. १६ एप्रिल २०२६ रोजी वर्तमानपत्रात जाहीर नोटीस देखील देण्यात आली होती. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दि. ६ मे २०२६ रोजी या जमिनीचे खरेदीखत करण्यात आले.
कुऱ्हाड-कोयत्याने हल्ला आणि गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न..
तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, दि. २० मे २०२६ रोजी मोडक हे आपल्या नवीन जमिनीवर गेले असता, त्या ठिकाणी हनुमंत साळुंके, योगेश साळुंके, त्यांचे जावई जगताप व इतर नातेवाईकांनी येऊन मोडक यांना हुज्जत घालत धक्काबुक्की केली. “ही जागा आमची आहे, पुन्हा इथे आलास तर हातपाय तोडून विहिरीत टाकून देऊ,” अशी धमकी देत त्यांना हाकलून लावले.
त्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. २१ मे रोजी मोडक हे सदर प्लॉट साफ करण्यासाठी जेसीबी मशीन घेऊन गेले असता, तिथे उपस्थित असलेल्या दिपाली किरण साळुंके हिने हातातील हत्याराने (बिळा/कोयता) मोडक यांच्यावर थेट जीवघेणा हल्ला केला. इतकेच नव्हे तर, हनुमंत साळुंके यांचा नातू आणि भाचा जगताप यांनी त्यांची ‘स्कॉर्पिओ’ गाडी थेट मोडक यांच्या अंगावर घालून त्यांना चिरडून मारण्याचा प्रयत्न केला.
लोणीकंद पोलिसांत धाव; कडक कारवाईची मागणी
या भीषण हल्ल्यातून आणि धमक्यांमधून वाचल्यानंतर रोहित मोडक यांनी तातडीने लोणीकंद पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची आपबिती सांगितली. आरोपींनी केवळ हल्लाच केला नाही, तर उलट आपल्यावरच खोटा गुन्हा दाखल केल्याचेही मोडक यांनी अर्जात म्हटले आहे. पोलिसांनी २३ मे २०२६ रोजी हा तक्रार अर्ज स्वीकारला असून, या प्रकरणाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित संशयित आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि न्याय द्यावा, अशी मागणी मोडक यांनी केली आहे. लोणीकंद पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत









