पुण्यात खळबळबळ! जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सहीने ‘एनए’चे (NA) आदेश काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड!!


पुणे: जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सहीने ‘एनए’चे आदेश; हवेली तालुक्यातील २४ एकर जमिनीचा बोगस प्रकार उघडकीस!

पुणे (विशेष प्रतिनिधी):

हवेली तालुक्यातील केसनंद येथील सुमारे २४ एकर अकृषक (NA – Non-Agricultural) जमिनीचे जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सहीद्वारे आदेश तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका सजग तलाठ्याच्या दक्षतेमुळे हा कोट्यवधी रुपयांचा फसवणुकीचा डाव वेळेत उधळला गेला असून, या प्रकरणी संबंधित जमीनमालकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 काय आहे नेमके प्रकरण?

केसनंद येथील गट नंबर १७२ मधील बाबासाहेब हरगुडे यांची १ लाख चौरस मीटर (सुमारे २४.७१ एकर) जमीन आहे. ही जमीन अकृषक (एनए) झाल्याची महसूल दप्तरी नोंद करण्यासाठी हरगुडे यांनी केसनंद येथील तलाठी शुभम वाबळे यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जासोबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या नावे असलेले ‘एनए’चे आदेश जोडण्यात आले होते.

तलाठ्याच्या दक्षतेमुळे बिंग फुटले!

तलाठी शुभम वाबळे यांनी या कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली असता, त्यांना संशय आला. नियमानुसार हवेली तालुक्यातील केसनंद गावाच्या कागदपत्रांवर ‘अप्पर तहसीलदार लोणी काळभोर’ असा उल्लेख असणे आवश्यक होते. मात्र, त्याऐवजी या पत्रावर ‘तहसीलदार हवेली’ असे कार्यालयाचे नाव लिहिलेले आढळले. या एका चुकीमुळे तलाठ्याला संशय आला आणि त्यांनी तात्काळ वरिष्ठ पातळीवर याची पडताळणी केली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही बनावट स्वाक्षऱ्या!

तपासणीअंती हे संपूर्ण पत्रच बोगस असल्याचे समोर आले. या पत्रावर केवळ जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचीच नव्हे, तर:

१) निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम

२) अप्पर तहसीलदार लोणी काळभोर (कोळते पाटील)

३) ‘पीएमआरडीए’चे (PMRDA) अधिकारी (बोगस झोन दाखला)

४) भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक विकास गोफणे

या सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आणि स्वाक्षऱ्यांचे पत्र जोडल्याचे उघड झाले. अप्पर तहसीलदार कोळते पाटील यांनी स्वतः या पत्रावरील सही आपली नसून बनावट असल्याचे स्पष्ट केले.

प्रशासनाची कडक भूमिका; गुन्हा दाखल करण्याचे आदेश!!

या गंभीर प्रकरणाची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले की, “जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सहीद्वारे ‘एनए’चे आदेश तयार करून सरकारची मोठी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या प्रकरणी संबंधित जमीनमालकाविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश अप्पर तहसीलदार यांना देण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.”.                                इतर प्रकरणांचाही शोध सुरू?

बनावट सहीद्वारे ‘एनए’चे आदेश तयार करून महसूल नोंद करण्याची आणखी काही प्रकरणे जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना अशा बोगस सह्यांच्या प्रकरणांचा कसून शोध घेण्याच्या आणि सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आणखी कुठे अशा प्रकारच्या बोगस पत्रांचा वापर झाला आहे का, याचा तपास आता महसूल विभागाकडून घेतला जात आहे.

या मोठ्या रॅकेटच्या मागे नेमका कोणाचा हात आहे? आणि याचे धागेदोरे कुठेपर्यंत पोहोचले आहेत? याचा तपास आता पोलीस करणार आहेत.

 


14
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!