काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; सातवनगरमध्ये ५ लाख २३ हजारांची अवैध गावठी दारू जप्त, एकाला अटक!


काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; ५ लाख २३ हजारांच्या अवैध हातभट्टी दारू साठ्यासह सँट्रो कार जप्त, एकाला अटक

हडपसर (पुणे): पुणे शहरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काळेपडळ पोलिसांनी एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. सासवड रोडवरील सातव नगर, हांडेवाडी रोड परिसरात छुप्या पद्धतीने साठवून ठेवलेली तब्बल ५ लाख २३ हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी एका ५० वर्षीय इसमाला अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेली सँट्रो कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

सुनील हरि कचरावत (वय ५० वर्षे, रा. गणपती मंदिराजवळ, सातवनगर, हांडेवाडी रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

दिनांक २५ मे २०२६ रोजी काळेपडळ पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार नितीन ढोले व गिरीराज जगदाळे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. सातवनगर येथील गणपती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत, एक इसम त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहनात गावठी हातभट्टी दारूचा साठा करून ती ओळखीच्या लोकांना विकत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेली माहिती तात्काळ तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) अमित शेटे यांना देण्यात आली. सपोनि शेटे यांनी काळेपडळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना अवगत केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, सपोनि अमित शेटे आणि पोलीस स्टाफने दोन पंचांसह सातवनगर येथील बातमीच्या ठिकाणी तात्काळ छापा टाकला.

झाडीझुडपात लपवला होता साठा:पोलिसांनी छापा टाकला असता, त्या ठिकाणी आरोपी सुनील कचरावत हा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी त्याची सँट्रो कार (क्र. MH 12 DS 4080) आणि आजूबाजूच्या झाडीझुडपांची कसून झडती घेतली. यावेळी पोलिसांना तब्बल २४५० लिटर गावठी हातभट्टी दारूने भरलेले एकूण ७० प्लास्टिकचे ड्रम मिळून आले. पोलिसांनी ५ लाख २३ हजार रुपये किमतीच्या या मुद्देमालासह आरोपीला रंगेहात ताब्यात घेतले.

याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २३८/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई),(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे करत आहेत.

या पथकाने केली कारवाई: सदरची उल्लेखनीय कामगिरी पूर्व प्रादेशिक विभागाचे पोलीस उप-आयुक्त जीयन बेनीवाल (परिमंडळ ६, पुणे शहर) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल नवगिरे (हडपसर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली; काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेप्रमाणे पार पडली.

या कारवाईत सपोनि अमित शेटे, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, अमोल फडतरे, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, शाहीद शेख, पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंढरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदिप बेडीस्कर, महादेव शिंदे आणि गिरीराज जगदाळे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे हांडेवाडी आणि सासवड रोड परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.


13
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!