पुण्यात मोठी कारवाई: बनावट नंबर प्लेटच्या कारमधून ९९.९३ लाखांचा गांजा जप्त, चौघांना अटक


पुणे शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात गुन्हे शाखेकडून धडक कारवाई करत तब्बल ९९.९३ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, शहरातील ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेला एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून अमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी केसानंद-वाडेबोलहाई रस्त्यावरील बोलहाईमाता मंदिर परिसरात सापळा रचला. संशयित कार तेथे येताच पोलिसांनी ती अडवून झडती घेतली असता, वाहनामध्ये लपवून ठेवलेली गांजाची तब्बल ९५ पाकिटे आढळून आली.

या कारवाईत मिवा कालिदार वाघमारे (वय ३६), विष्णू भागवत वाघमारे (वय २५), हरी श्रीपती दाबळे (वय ३२) आणि मनोज अनिल सुरवासे (वय २९) या चौघांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

पोलिस चौकशीत आरोपींनी गांजा पुण्यात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्यानंतर करमाळा येथील त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात आणखी १८ किलो गांजा जप्त करण्यात आला. एकूण जप्त गांजा आणि वाहनाची किंमत ९९.९३ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी लोहेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत कठोर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


10
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!