वानवडी–साळुंखे विहार प्रभाग १८ : काँग्रेस–भाजपमध्ये समसमान विजय…
पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत२०२५-२६ वानवडी–साळुंखे विहार परिसरातील प्रभाग क्रमांक १८ हा अत्यंत चुरशीचा ठरला. या प्रभागातील चारही जागांचे निकाल जाहीर झाले असून काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळाला आहे. मतमोजणीदरम्यान प्रत्येक फेरीत चढ-उतार पाहायला मिळाले आणि निकाल जाहीर होताच परिसरात राजकीय हालचालींना वेग आला.
प्रभाग १८-अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) या जागेवर काँग्रेसचे विजयी उमेदवार अॅड. साहील केदारी यांनी 14,382 मते मिळवत विजय मिळवला. भाजपचे धनराज बाळुराव घोगरे यांना 13,080 मते मिळाली. अत्यल्प मतांच्या फरकामुळे ही लढत शेवटपर्यंत रंगतदार ठरली.
प्रभाग १८-ब (सर्वसाधारण महिला) या जागेवर भाजपच्या विजयी उमेदवार कालिंदा मुरलीधर पुंडे यांनी 16,641 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसच्या जगताप रत्नप्रभा सुदाम यांना 12,844 मते मिळाली. महिला मतदारांचा मोठा पाठिंबा भाजप उमेदवाराला मिळाल्याचे चित्र दिसून आले.
प्रभाग १८-क (सर्वसाधारण महिला) या जागेवरही भाजपने आपले वर्चस्व राखले. भाजपा विजयी उमेदवार कोमल समीर शेंडकर यांनी 15,935 मते मिळवत विजय संपादन केला. काँग्रेसच्या जांभुळकर शमीका प्रफुल यांना 12,851 मते मिळाली. सलग दुसऱ्या महिला जागेवर भाजपच्या विजयामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला.
प्रभाग १८-ड (सर्वसाधारण) या जागेवर काँग्रेसचे विजयी उमेदवार जगताप प्रशांत सुदाम यांनी 15,547 मते मिळवत विजय मिळवला. भाजपचे अभिजीत शिवकर यांना 13,719 मते मिळाली. या प्रभागात राष्ट्रवादी, शिवसेना, आप व अपक्ष उमेदवारांनाही काही प्रमाणात मते मिळाली, मात्र मुख्य लढत काँग्रेस–भाजपमध्येच रंगली.
एकूणच प्रभाग १८ मध्ये मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत न देता समसमान कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके फोडून व घोषणाबाजी करत आनंद साजरा केला. तर पराभूत उमेदवारांनी निकाल स्वीकारत पुढील काळात जनतेसाठी अधिक ताकदीने काम करण्याची भूमिका मांडली आहे.
प्रभाग १८ चे निकाल आगामी महापालिका राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार असून स्थानिक विकास, नागरी सुविधा आणि राजकीय समीकरणांवर याचा थेट परिणाम होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.








