पुणे : उंड्री हवेली येथील ऑर्चिड द इंटरनॅशनल स्कूल विरोधात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष संदीप गायकवाड यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर पुणे शहरातील अनेक अनधिकृत शाळांचा भांडाफोड झाला आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शहरातील १३ अनधिकृत शाळांची यादी जाहीर करत पालकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
मनपाने जाहीर केलेल्या यादीमध्ये ऑर्चिड द इंटरनॅशनल स्कूल, उंड्री ता. हवेली, पुणे या शाळेचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. संबंधित शाळेविरोधात शासन नियमांचे उल्लंघन करून परवानगीशिवाय वर्ग सुरू केल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
संदीप गायकवाड यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच शहरातील इतर अनधिकृत शाळांची माहिती पुढे आल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू आहे. पालकांची फसवणूक होऊ नये तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही यादी जाहीर करण्यात आल्याचे मनपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिकेने जाहीर केलेल्या अनधिकृत शाळा :
१) ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, उंड्री ता. हवेली, पुणे
२) न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, विवेकवाडी, पुणे
३) Mahatma Gandhi Prashala, येरवडा, पुणे
४) टीम्स टक्का इस्लामिक स्कूल अँड मदरसा, कोंढवा बुद्रुक, पुणे
५) सेंट ट्यूज इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा बु., पुणे
६) इमॅन्युअल पब्लिक स्कूल, महमदवाडी रोड, हडपसर, पुणे
७) आकाश अकॅडमी स्कूल, लोणीकाळभोर, पुणे
८) एन्जो मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन इंग्लिश स्कूल, नऱ्हे, पुणे
९) लेन्सरी हाय स्कूल, अशोक नगर, कोंढवा बु., पुणे
१०) शिवली नोमानी इंग्लिश मीडियम स्कूल, कोंढवा बु., पुणे
११) ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट न्यू फ्लोरा इस्लामिक स्कूल, कोंढवा, पुणे
१२) ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल, औंधगाव बु., पुणे
१३) आर्यन वर्ल्ड स्कूल, उंड्री, पुणे
पुणे मनपाच्या शिक्षण विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, आकर्षक जाहिराती आणि भुलथापांना बळी पडू नये. आपल्या मुलांचे प्रवेश केवळ शासनमान्य व अधिकृत शाळांमध्येच घ्यावेत. अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जनतेच्या मनात पडलेला प्रश्न जर ह्या शाळा अनधिकृत रित्या इतकी वर्ष सुरू आहेत तर या शाळांवर या पुर्वी च कार्यवाही का झाली नाही?









