
कदमवाकवस्ती येथील एका जमिनीच्या वादातून माजी सरपंचाने महिलेला अश्लील शिवीगाळ करत, तिच्या विनयभंगासह जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी माजी सरपंच चित्तरंजन त्रिंबक गायकवाड यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
वादाचे कारण: पीडित महिलेची वडिलोपार्जित २५ गुंठे जमीन असून, एकत्रिकरण प्रक्रियेतील त्रुटींमुळे नोंदींबाबतचा वाद भूमी अभिलेख कार्यालयात प्रलंबित आहे.
दडपशाही: १५ एप्रिल रोजी शासकीय मोजणी सुरू असताना आरोपीने शेतात जाऊन महिलेला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच “खोटे गुन्हे दाखल करू”, “धडा शिकवू” आणि “वीज कनेक्शन तोडून टाकू” अशा धमक्या दिल्या.
बळजबरीने ताबा: आरोपीने केवळ धमक्या देऊन न थांबता, जमिनीवर बळजबरीने कंपाउंड टाकून ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. २० एप्रिल रोजी पुन्हा एकदा पीडित महिला आणि तिच्या कुटुंबाला दमदाटी केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पीडित महिलेने धैर्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७९, ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









