कुंजीर वाडी परिसरातील एका बापाने आपल्या बेपत्ता लेकीच्या शोधासाठी आता थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महिना उलटूनही मुलीचा कोणताही पत्ता न लागल्याने आणि पोलीस प्रशासनाकडून समाधानकारक कारवाई होत नसल्याचा आरोप करत, येत्या १४ तारखेला कुंजीर वाडी
ते सीपी ऑफिस असा ‘अर्धनग्न पायदळ मोर्चा’ काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
व्हिडिओद्वारे आपल्या व्यथा मांडताना पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, एका नराधम आरोपीने त्यांच्या मुलीला फूस लावून, काहीतरी बोलून किंवा ब्लॅकमेल करून पळवून नेले आहे. या संदर्भात काही ऑडिओ रेकॉर्डिंग्ज देखील हाती लागल्या आहेत, तरीही प्रशासन तपासात हलगर्जीपणा करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
कुटुंबाची दयनीय अवस्था”महिना झाला, पण लेकीचा पत्ता नाही. डोळ्यांतील पाणीही आटले आहे आणि आता आमची सहनशक्ती संपली आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपले दुःख व्यक्त केले. मुलीच्या चिंतेपोटी आईची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आंदोलनाचा इशारा……
जर आपल्या मुलीच्या बाबतीत काही बरे-वाईट घडले, तर त्याला पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा वडिलांनी दिला आहे. आपल्या हक्काच्या लढाईसाठी आणि लेकीच्या न्यायासाठी त्यांनी सर्व नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे व पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
१४ तारीखे ला कुंजीरवाडी ते सीपी ऑफिस (पुणे) अर्धनग्न पायदळ (चालत) मोर्चा
बेपत्ता मुलीचा त्वरित शोध घेऊन आरोपीवर कठोर कारवाई व्हावी.अशी मागणी जोर धरू लागली आहे.









