हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालय
(विशेष प्रतिनिधी):
हडपसर गाडीतळ हे पुण्यातील अत्यंत गजबजलेले आणि हजारो प्रवाशांचे प्रमुख केंद्र मानले जाते. या ठिकाणी दररोज हजारो नागरिक आणि प्रवासी ये-जा करतात. परंतु, येथील सार्वजनिक सुलभ शौचालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, नागरिक व प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
१-१० रुपयांची सक्तीची वसुली, पण घाणीचे साम्राज्य!
शौचालयाचा वापर करणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडून सर्रास ₹१० रुपये उकळले जातात. पैसे घेऊनही स्वच्छतेचा पत्ता नाही. शौचालयाची दारे तुटलेली आहेत, फरश्या उखडलेल्या अवस्थेत असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नळाची दुरवस्था आणि कपडे-कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसून येत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
हडपसर-(मांजरी) क्षेत्रीय कार्यालयाचे दुर्लक्ष
एकीकडे महापालिका आणि प्रशासन स्वच्छतेचे मोठे दावे करत असताना, हडपसर गाडीतळावरील या शौचालयाकडे हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. वसुलीचे पैसे कोणाच्या खिशात जात आहेत आणि स्वच्छतेबाबत विचारणा कोणाला करायची, असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत.
नागरिकांची मागणी:
शौचालयाची तात्काळ दुरुस्ती व स्वच्छता करण्यात यावी.
अनधिकृत आणि जादा दर वसुली करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी.
क्षेत्रीय कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यांनी तात्काळ या जागेची पाहणी करावी.
जर प्रशासनाने या समस्येकडे लवकरात लवकर लक्ष दिले नाही, तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा स्थानिक प्रवाशांनी दिला आहे.









