पुणे:
काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने धडाकेबाज कारवाई करत ३ दुचाकी, १ रिक्षा आणि १ मोबाईल फोन चोरणाऱ्या एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ४,५०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
- सीसीटीव्ही आणि खबऱ्याच्या बातमीवरून कारवाई ,
काळेपडळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार दाखल असलेल्या गुन्ह्यातील (गु.र.नं. २९२/२०२६) चोरीस गेलेल्या दुचाकीचा शोध पोलीस घेतात होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) अमित शेटे व त्यांचे पथक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत असताना, पोलीस हवालदार शाहिद शेख आणि पोलीस अंमलदार अतुल पंधरकर यांना खबऱ्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली.
चोरीची दुचाकी घेऊन एक इसम उंड्री येथील हिलग्रीन शाळेसमोरील रस्त्यावर थांबला असल्याची पक्की बातमी मिळताच सपोनि अमित शेटे व पथकाने तातडीने तेथे जाऊन विधीसंघर्षित बालकाला दुचाकीसह ताब्यात घेतले.
तपासात उघड झाले चोरीचे गुन्हे ,पोलिसांनी बालकाकडे अधिक चौकशी केली असता त्याने काळेपडळ आणि राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विविध वाहने व मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:
मोबाईल फोन: एक ओप्पो कंपनीचा मोबाईल (किंमत ₹२०,०००)
दुचाकी १: होंडा ड्रीम युगा (MH-12 KU-6431) (किंमत ₹४०,०००)
दुचाकी २: निळ्या रंगाची अॅक्टिव्हा मोपेड (MH-12 VR-6474) (किंमत ₹८०,०००)
रिक्षा: बजाज रिक्षा (MH-14 GC-7126) (किंमत ₹२,५०,०००)
दुचाकी ३: हिरो स्प्लेंडर (MH-12 JR-9663) (किंमत ₹६०,०००)
एकूण जप्त मुद्देमाल: ₹४,५०,०००/-
तपास अधिकारी: सपोनि अमित शेटे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
पोलीस पथकाची कामगिरी
ही कामगिरी जीवन बेनीवाल (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६), अतुल नवगिरे (सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गिरीषा निंबाळकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन) यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
या कारवाईत सपोनि अमित शेटे, सपोफौ. राजस शेख, पोलीस हवालदार प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, निलेश देसाई, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, शाहिद शेख तसेच पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे आणि गिरीराज जगदाळे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.









