पुणे, : हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एका व्यक्तीकडून दिव्यांगांसाठी असलेल्या विशेष गाडीचा वापर करून रस्त्यावर व्यवसाय केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित व्यक्ती प्रत्यक्षात दिव्यांग नसूनही दिव्यांगांसाठी असलेल्या सुविधांचा लाभ घेत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारामुळे खऱ्या दिव्यांग व्यक्तींची प्रतिमा मलिन होत असून शासनाच्या योजनांचा गैरवापर होत आहे. संबंधित व्यक्तीने ही गाडी कोणत्या निकषांवर मिळवली, याची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
नागरिकांनी हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून, जर गैरव्यवहार आढळला तर संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांचा गैरवापर होणार नाही, यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संबंधित व्यक्ती दिव्यांग नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे.










