
निवडणूक संपली, विकास थांबला? हडपसरमधील ‘त्या’ धोकादायक पुलामुळे नागरिकांचा जीव टांगणीला!
हडपसर (पुणे): प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे हडपसरमधील ससाणे नगर येथील नवा कॅनॉलवरील पुलाची अवस्था अत्यंत दयनीय आणि धोकादायक झाली आहे. तब्बल चार महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या आधी घाईघाईने जुना पूल पाडून नवीन कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र, निवडणूक संपताच हे काम पूर्णपणे ठप्प झाले असून, यामुळे स्थानिक नागरिकांच्या आणि वाहनचालकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय पाटील तालीम संघाचे अध्यक्ष उल्हास तुपे यांनी स्थानिक नागरिकांच्या वतीने प्रशासनाच्या या संथ आणि निष्काळजी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
निकृष्ट दर्जाचे पत्रे आणि सुरक्षेचा अभाव
वाहतूक रोखण्यासाठी आणि सुरक्षेसाठी पुलाच्या कडेला लावण्यात आलेले पत्रे अत्यंत हलक्या आणि निकृष्ट दर्जाचे आहेत. या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, दुचाकीस्वार आणि लहान मुलांच्या स्कूल बस ये-जा करत असतात. रात्रीच्या वेळी तर हा धोका अधिकच वाढतो. एखादे वाहन या पत्रांना धडकल्यास ते थेट कॅनॉलमध्ये कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वीच एक दुचाकीस्वार कॅनॉलमध्ये पडल्याची घटना घडली होती, सुदैवाने स्थानिक तरुणांच्या तत्परतेमुळे त्याचे प्राण वाचले.
निधीची उधळपट्टी आणि अधिकाऱ्यांची बदली
“या पुलाच्या दुरुस्तीसाठी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. तरीही काम रखडले आहे. दुसरीकडे, मेट्रोसाठी जो पूल भविष्यात पाडला जाणार आहे, त्यासाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून जनतेच्या टॅक्सच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे,” असा थेट आरोप उल्हास तुपे यांनी केला आहे.
संबंधित विभागाचे अभियंता नारस साहेब यांची बदली झाल्याचे समजते, मात्र त्यांच्या जागेवर आलेल्या नवीन अधिकाऱ्यांनी अद्याप या गंभीर समस्येकडे लक्ष दिलेले नाही. एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींना आवाहन या भागातील नागरिकांनी ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले आहे, ते देखील याच रस्त्यावरून प्रवास करतात. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी आणि लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेवून हडपसरच्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी या प्रश्नात तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा..
प्रशासनाने या धोकादायक पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करून ते वेळेत पूर्ण केले नाही, तर हडपसर पंचक्रोशीतील नागरिक आणि जनतेच्या वतीने प्रशासनाविरुद्ध तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रीय पाटील तालीम संघाचे अध्यक्ष मा .उल्हास तुपे आणि स्थानिक नागरिकांनी दिला आहे.









