पुणे: हडपसर परिसरातील ससाणेनगरमध्ये जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्याचा छडा लावत काळेपडळ पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवून मुख्य आरोपीसह त्याच्या ६ साथीदारांना ४८ तासांच्या आत अटक केली आहे.
दिनांक ३ मे २०२६ रोजी रात्री १०:३० वाजता ससाणेनगर येथील हिंगणे बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये गणेश संजू बिरादार (वय २५) याच्यावर सिमेंटचा ब्लॉक घालून त्याची हत्या करण्यात आली होती. मृत गणेश याचे शीतल कांबळे या महिलेशी संबंध होते. शीतलची मुलगी हिरा हिचा प्रियकर दुर्वांग उर्फ पारस सूनिल मानकर याला हे संबंध मान्य नव्हते. तसेच काही महिन्यांपूर्वी गणेशने दुर्वांगला मारहाण केली होती. याच जुन्या रागातून आणि वादातून दुर्वांगने आपल्या साथीदारांच्या मदतीने गणेशचा काटा काढण्याचे ठरवले.
अटक करण्यात आलेले आरोपी:१. दुर्वांग उर्फ पारस सुनिल मानकर (मुख्य आरोपी – वय २१, रा. शुक्रवार पेठ)
२. सागर शेलार (वय २४, रा. ससाणेनगर)
३. चंद्रशेखर सोमनाथ जावीर (वय २०, रा. सुखसागर नगर)
४. सुरज रमेश दोरकर (वय २१, रा. हडपसर)
५. पारस किशोर गायकवाड (वय २१, रा. दत्तवाडी)
६. अभिजीत संजय इंगळे (वय २२, रा. दत्तवाडी)
तपास पथकाची कामगिरी: गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी ३ तपास पथके तयार केली होती. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खेड-शिवापूर ते कात्रज परिसरात येणार असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपींना १३ मे २०२६ पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अण्णासो बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या पथकात अमित शेटे, अजय हंचाटे (सहा. पोलीस निरीक्षक) आणि पोलीस कर्मचारी प्रवीण काळभोर, निलेश देसाई, दाऊद सय्यद, प्रतीक लाहगुडे, अमोल फडतरे, परशुराम पिसे, राजु वाघमारे, शाहिद शेख, बालु ठाकुर, अतुल पंधरकर, महादेव शिंदे, प्रदिप बेडीस्कर, गिरीराज जगदाळे, विशाल ठोंबरे, सद्दाम तांबोळी, राकेश साळुंखे आणि नितीन ढोले यांचा समावेश होता. या टीमने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.









