क्रेडिट कार्ड थकबाकी वसुलीप्रकरणी हडपसरमध्ये मारहाण; दोन्ही बाजूंनी हल्ल्याची नोंद!!!!!
पुणे (हडपसर) : क्रेडिट कार्ड थकबाकी वसुलीच्या वादातून हडपसर परिसरात भररस्त्यात मारहाणीची घटना घडली. या प्रकरणात आधी वाद वाढत असताना संबंधित व्यक्तीनेच वसुली एजंटवर काठीने हल्ला करून दमदाटी करत मारहाण केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर परिस्थिती चिघळत जाऊन एजंटांकडूनही संबंधित व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे.
ही घटना पुणे–सोलापूर रस्त्यावरील पंधरा नंबर चौक परिसरात घडली. वादाची सुरुवात थकबाकी वसुलीवरून झाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सुरुवातीला संबंधित व्यक्तीने एजंटला काठीने मारहाण केली व धमकावण्याचा प्रयत्न केला. यानंतर वाद अधिक तीव्र झाला आणि एजंटांकडूनही प्रत्युत्तरादाखल मारहाण करण्यात आली.
घटनेदरम्यान मोठी गर्दी जमली होती. काही नागरिकांनी या प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. या व्हिडिओमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.









