सराईत गुंडाचा मित्रांकडूनच खून; ५ जण अटकेत, एक अल्पवयीन ताब्यात
पुणे : जुन्या वादातून सराईत गुंडाचा त्याच्याच मित्रांनी निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फुरसुंगी परिसरात घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
आकाश ऊर्फ राणा मोहन कांबळे (वय २६, रा. गंगानगर, फुरसुंगी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची चुलत बहीण रेखा प्रभाकर कांबळे (वय ४२, रा. लिंबोणीनगर, पुणे स्टेशन परिसर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
आदित्य नामेश्वर पिंपळे (वय २०, रा. प्रियदर्शनी रेसिडेन्सी, हडपसर),
आदित्य कांबळे (वय २०),
ओमकार प्रमोद मोरे (वय २३, रा. काळेबोराटेनगर, हडपसर),
अरुण अनिल यादव (वय २४, रा. शिवचैतन्य कॉलनी, शेवाळवाडी),
दत्ता व्यंकट गिते (वय २०, रा. शेवाळवाडी, फुरसुंगी).
ही घटना २८ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास रुपीनगर येथील देशमुख पेट्रोल पंपाच्या मागील परिसरात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, राणा कांबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दरोड्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न आणि चोरीचे अनेक गुन्हे दाखल होते. त्याला तडीपारही करण्यात आले होते.
राणा आपल्या मित्रांसोबत फिरत असताना त्यांना वारंवार त्रास देत होता. त्याने स्वतः बनवून घेतलेली पालघनसारखी धारदार हत्यारे ओमकार मोरे याच्याकडे ठेवली होती. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी राणावर त्याच हत्याराने डोके, मान, चेहरा व हातांवर सपासप वार करून खून केला.
घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत मस्तानी तलाव परिसरात सापळा रचून तिघा आरोपींना अटक केली. उर्वरित आरोपींनाही नंतर ताब्यात घेण्यात आले. आरोपी अरुण यादव याला यापूर्वी दोन वर्षांसाठी तडीपार केले असतानाही तो शहरात राहत असल्याचेही उघड झाले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राम राजमाने, पोलीस हवालदार सुरेंद्र जगदाळे, हवालदार नितीन मुंडे, कुसाळकर, अमोल घावटे, पोलीस अंमलदार पवन भोसले यांनी केली.”










