पुण्यात घरगुती गॅसचा तुटवडा; बुकिंग करूनही सिलिंडर मिळेना, नागरिकांचे अतोनात हाल
पुणे: इराण अमेरिका युद्धाच्या झळा आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचल्या आहेत. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. विशेष म्हणजे, ऑनलाइन बुकिंग करूनही अनेक दिवस सिलिंडर मिळत नसल्याने गृहिणींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पाच-पाच तास रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाती परतण्याची वेळ
पुण्यातील व हडपसर परिसरातील विविध गॅस एजन्सीसमोर पहाटेपासूनच नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. “आम्ही गेल्या १५ दिवसांपासून बुकिंग करत आहोत, पण बुकिंग होत नाहीये. कसं तरी बुकिंग झालं तर आता गॅस मिळत नाहीये,” अशा तक्रारी महिलांनी ‘केल्या. काही ठिकाणी पाच तास रांगेत उभे राहूनही साठा संपल्याचे सांगून नागरिकांना परत धाडले जात आहे.
काही महिला भगिनींनी गॅसअभावी चिमुकल्यांवर उपासमारीची वेळ येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ता अमोल तुपे यांच्यासमोर मांडली व्यथा.

पुण्यातील समिधा गॅस एजन्सीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, साठा असून सुद्धा तीन-चार दिवस उलटूनही गॅस न मिळाल्याने घरात स्वयंपाक करणे अशक्य झाले आहे. यामुळे लहान मुलांच्या खाण्यापिण्याचे हाल होत असून, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गॅसच्या या टंचाईमुळे नागरिक आता इलेक्ट्रिक शेगड्या किंवा कोळशाच्या शेगड्यांचा पर्याय शोधताना दिसत आहेत.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांकडून होणारा गॅस पुरवठा कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गॅस टंचाईच्या अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “काही लोक फक्त अफवा पसरवत आहेत, पुरवठा सुरळीत आहे” असे स्पष्ट केले असले तरी, प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळीच असल्याचे दिसून येते.
पुण्यातील या गॅस टंचाईवर प्रशासन कधीपर्यंत मार्ग काढते, याकडे आता सर्व पुणेकरांचे लक्ष लागले आहे.









