नगरसेवक विकास भाडळे व गटनेते प्रशांत भाडळे यांच्या प्रयत्नांना यश

उरुळी देवाची गावामध्ये महिला सुरक्षेसह कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने दोन पोलिस चौक्यां (आऊटपोस्ट) उभारणीस मंजुरी मिळून आज त्यांचे भूमिपूजन संपन्न झाले.
फुरसुंगी–उरुळी देवाची पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (PI) श्री अमोल मोरे साहेब यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा भूमिपूजन सोहळा पार पडला.
गावातील वाढती लोकसंख्या, महिलांची सुरक्षितता, तसेच नागरिकांची कामे गावातच व्हावीत यासाठी नगरसेवक श्री विकास भाडळे यांनी वेळोवेळी पुणे शहर पोलीस आयुक्त (CP) साहेबांशी प्रत्यक्ष भेटी घेऊन सुरक्षेचा प्रश्न मांडला होता. तसेच फुरसुंगी–उरुळी देवाची पोलिस स्टेशनला २ ते ३ वेळा पत्रव्यवहार व निवेदने सादर करण्यात आली होती.
या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, त्याच अनुषंगाने आज पोलिस आऊट पोस्टच्या कामास अधिकृत सुरुवात झाली आहे. यामुळे परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसेल तसेच नागरिकांना तात्काळ पोलिस सेवा उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमास नगरसेविका सौ. पल्लवी ताई अबनावे, नगरसेविका सौ. माईताई भाडळे, तसेच सावली होम्स मधील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.








