व्हिडिओ व्हायरल झाला अन् पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले! दिवे घाटात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीतील ५ जण जेरबंद, २ बालके ताब्यात!


दिवे घाटात बुलेटचा सायलेन्सर वाजवून आणि धारदार हत्यारांनी दहशत माजवणारी टोळी गजाआड; फुरसुंगी पोलिसांची धडक कारवाई!

पुणे /हवेली

दिवे घाटात बुलेट मोटारसायकलच्या सायलेन्सरचा कर्कश आवाज करत, हातात धारदार व टोकदार लोखंडी हत्यारे हवेत उंचावून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीच्या फुरसुंगी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी या कारवाईत ५ आरोपी आणि २ विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून बुलेट आणि धारदार शस्त्रे असा एकूण १,१५,२०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

न्युज चॅनेलवरील ‘त्या’ व्हिडिओनंतर पोलिसांची तात्काळ दखल….

दिनांक १४/०५/२०२६ रोजी रात्री साधारण ०१:०७ वाजण्याच्या सुमारास दिवे घाट (ता. हवेली) येथे ३० ते ४० तरुणांचा एक घोळका गोळा झाला होता. या टोळक्याने बुलेटच्या सायलेन्सरचे कर्कश आवाज काढत आणि हातातील धारदार शस्त्रे हवेत फिरवून आरडाओरडा केला, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा व्हिडिओ न्यूज चॅनेल्सवर प्रसारित झाल्यानंतर फुरसुंगी पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन भारतीय न्याय संहिता (BNS) आणि आर्म्स ॲक्टच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

वाघोली-केसनंद परिसरात सापळा रचून आरोपींना ठोकल्या बेड्या….

गुन्ह्याचा तपास फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार आणि त्यांच्या पथकाकडे सोपवण्यात आला. व्हिडिओतील वर्णनावरून संशयित आरोपी हे आव्हाळवाडी (वाघोली) परिसरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी वाघोली भागात सापळा रचून प्रथम प्रेम नवले याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, या गुन्ह्यात त्याचे साथीदार वेदांत प्रमोद कुटे, यश लक्ष्मण कुटे आणि एका विधीसंघर्षित बालकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत केसनंद परिसरातून प्रणव सोमनाथ ढोरे, दर्शन लिंबाजी पारसे आणि आणखी एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी…..

ही धडक कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे मा. डॉ. सागर कवडे (पोलीस उप-आयुक्त, मुख्यालय अतिरिक्त कार्यभार परिमंडळ-६), मा. अनुराधा उदमले (सहा. पोलीस आयुक्त, लोणीकाळभोर विभाग), मा. अमोल मोरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फुरसुंगी पो.स्टे.) आणि राजेश खांडे (पोलीस निरीक्षक, गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार करण्यात आली.

तपास पथकातील पोउनि विनोद पवार, सपोफौ कदम, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, सागर वणवे, सतिश काळे, सुनिल कांबळे, वैभव भोसले आणि पोलीस अंमलदार हेमंत कामथे, योगेश गायकवाड, गणेश शिंदे यांनी या कारवाईत उल्लेखनीय कामगिरी बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करत आहेत.


15
कृपया वोट करा

NEW रोखठोक महाराष्ट्र NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!