मांजरी बुद्रुक येथे मुळा-मुठा नदीपात्रात महापालिकेच्या डंपरकडूनच राडा-रोडा व कचरा टाकला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
एका महिन्यापूर्वी मांजरी बुद्रुक येथील मुळा-मुठा नदीपात्रातील पुलाजवळ पुणे महानगरपालिकेचा डंपर राडा-रोडा आणि कचरा टाकताना माजी शासन नियुक्त नगरसेवक मा.बाळासाहेब घुले यांनी रंगेहाथ पकडला. डंपर चालकाकडे चौकशी केली असता, झेड कॉर्नर ४० फुटी रोडवरून हा कचरा आणल्याचे आणि
मुकादम सूर्यकांत लांडगे यांच्या सांगण्यावरूनच तो नदीपात्रात टाकत असल्याचे ड्रायव्हरने स्पष्ट केले.
याबाबत घुले यांनी संबंधित मुकादमाला जाब विचारला असता, “आम्ही त्या ठिकाणी कचरा टाकण्याचा नवीन पॉईंट तयार करत आहोत,” असे धक्कादायक उत्तर मुकादमाने दिले. यावर, “ती जागा गणेश विसर्जनाची आहे, तिथे असा कोणताही पॉईंट करू नका आणि दोन दिवसांत हा कचरा उचलून घ्या; अन्यथा सोशल मीडियावर फोटो टाकेन,” असा इशारा घुले यांनी दिला होता. त्यावेळी मुकादमाने ४ ते ५ दिवसांची मुदत मागितली होती.
महिना उलटला तरी कचरा तसाच; प्रशासनाचे दुर्लक्ष
आज पूर्ण एक महिना उलटूनही महापालिकेने तो राडा-रोडा उचललेला नाही. महापालिकेच्याच या बेजबाबदार कृत्यामुळे आता इतर नागरिकही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा आणि राडा-रोडा आणून टाकत आहेत, ज्यामुळे नदीपात्राची प्रचंड दुर्दशा झाली आहे.
या संपूर्ण प्रकाराची माहिती तात्काळ हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या मुंढे मॅडम यांना देण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
गणेशोत्सव तोंडावर आला असताना विसर्जन स्थळाची ही दुरवस्था जबाबदार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच झाली आहे. त्यामुळे नदीपात्राचे प्रदूषण करणाऱ्या आणि बेकायदेशीरपणे कचरा पॉईंट बनवणाऱ्या संबंधित मुकादम व कर्मचाऱ्यांवर प्रशासन दंडात्मक किंवा निलंबनाची कारवाई करणार का? असा संतप्त सवाल बाळासाहेब घुले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. मुकदम सूर्यकांत लांडगे याच्यावर कारवाई होणार का?









