पुणे मनपात २ ते १५ लाखांत शिपायापासून अभियंत्यापर्यंत नोकरीचे बनावट रॅकेट; १५० हून अधिक तरुणांची कोट्यवधींची फसवणूक, ६ आरोपींना अटक
पुणे:
पुणे महानगरपालिकेसह इतर महानगरपालिकांमध्ये शिपाई ते अभियंता अशा विविध पदांवर कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बनावट लेटरहेड आणि पे-स्लिपचा वापर…
आरोपींनी पुणे पालिकेचे बनावट लेटरहेड, शिक्के आणि खोट्या स्वाक्षऱ्यांचा वापर करून उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्रे, ओळखपत्रे आणि पे-स्लिप्स दिल्या होत्या. उमेदवारांच्या बँक खात्यात पगार जमा झाल्याचा आभास निर्माण करून त्यांना फसवले जात होते. तपासादरम्यान पोलिसांना १५० हून अधिक उमेदवारांची माहिती असलेली एक एक्सल शीट सापडली आहे.
विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल
शिवाजीनगर पोलीस ठाणे: १७ जणांची सुमारे २ कोटी २ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. यात एका तरुणाकडून ४५ लाख रुपये उकळल्याचा समावेश आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाणे: ७ जणांची सुमारे १.५ कोटी रुपयांची फसवणूक.
स्वारगेट पोलीस ठाणे: ३ ते ४ जणांची सुमारे ३० लाख रुपयांची फसवणूक.
आरोपींची माहिती..
अटक करण्यात आलेले आरोपी: रोनित सतीश कुंभार, लीना दयानंद गायकवाड, अमित सुहास देशपांडे, अमित दारवटकर, आनंद लोंडनवार आणि शिवानंद बाळासाहेब पाटील.
फरार आरोपी (शोध सुरू): राजेंद्र बबन खेडकर, संजय अनंत भालेराव आणि नमिता गोवर्धन बनसोडे.
(खेडकर, भालेराव आणि पाटील हे या रॅकेटचे मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा आहे).
निलंबित कर्मचारी शिवानंद पाटीलचा आणखी एक पराक्रम; १ कोटी २० लाखांची फसवणूक
पुणे पालिकेतून निलंबित झालेला कर्मचारी शिवानंद बाळासाहेब पाटील (वय ४५, रा. आनंद कॉलनी, कर्वेनगर) याने आपण पालिकेत क्रीडा अधीक्षक असल्याचे सांगून तरुणांना १ कोटी २० लाखांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
याबाबत धायरीतील एका ३५ वर्षीय तरुणाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाटील याने मंत्रालयात चांगली ओळख असल्याचे सांगून फिर्यादीकडून कनिष्ठ अभियंता पदासाठी १५ लाख रुपये घेतले. त्यानंतर त्याच्या ओळखीतल्या इतर ६ तरुणांकडून विविध पदांच्या आमिषाने एकूण १ कोटी ५ लाख रुपये रोख स्वरूपात उकळले. आरोपीने या सर्वांना पालिकेचे बनावट स्वाक्षरी असलेले नियुक्तीपत्र दिले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पाटीलला अटक केली आहे.









