स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; कोंढवा पोलिसांची धडक कारवाई!!
कोंढवा, पुणे : कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पा सेंटरच्या नावाखाली महिलांकडून कथित वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक करून पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
कोंढवा परिसरातील रिफ्रेश स्पा सेंटर, ए-५०१ व ए-५०२, मॅजेस्टिक बिझनेस, बी.जी. लोहकरे रोड, कोंढवा येथे महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेमनाळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी माहितीची खात्री करून कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गाडगे, सहायक पोलीस फौजदार शरद वाकसे, पोलीस हवालदार अमोल हिरे, पोलीस शिपाई राहुल रासगे, स्वागत पळसे, अमित सूर्यवंशी, तसेच महिला पोलीस शिपाई पूजा नागरगोजे आणि स्वाती शिंदे यांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या कथित गैरप्रकाराची खात्री केली.
कारवाईदरम्यान स्पा सेंटरचा मॅनेजर मोनको लोएम (वय ३६, रा. तळेकर कॉलनी, पिंगळे वस्ती, मुंढवा, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या तपासात तेथे तीन महिला आढळून आल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, मॅनेजर महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित मॅनेजरला अटक करून महिलांची सुटका करण्यात आली आहे. कारवाई भारतीय न्याय संहिता सन २०२३ मधील कलम १४३ तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ मधील संबंधित कलमांनुसार करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या कारवाईसाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिसांनी कामगिरी बजावली.









