पुणे: शहरात अवैध अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध पुणे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने लोणी काळभोर परिसरातील वडकीनाल्यातून एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
प्रभात उर्फ संदिप शांताराम आंबेकर (वय २६ वर्ष, रा. साबळेमळा, वडकीनाला, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत १८ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान अवैध हत्यारे बाळगणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. यानुसार युनिट-६ चे पथक पेट्रोलिंग करत असताना, पोलीस हवालदार अमित कांबळे यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, वडकीनाला परिसरात एक तरुण कमरेला पिस्तूल लावून फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी प्रभात आंबेकर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता पोलिसांना ४१,२०० रुपये किमतीचे १ गावठी पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे मिळून आली.
आरोपीविरुद्ध फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) व मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस हवालदार प्रमोद टिळेकर, बाळासाहेब सकटे, प्रशांत कर्णावट, नानासाहेब मोरे, अमित कांबळे, गणेश माने, उमेश शेलार आणि महिला पोलीस अंमलदार पल्लवी मोरे, मनिषा लोखंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.









