पुणे | प्रतिनिधी
पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील धोबी घाट, शंकरशेठ रोड येथील शिलोह मराठी चर्च ऑफ ख्राईस्ट या चर्चवर आज (१७ एप्रिल २०२६) पाडकामाची कारवाई करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी जेसीबी व इतर यंत्रसामग्रीसह दाखल झाले होते. या कारवाईमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.चर्च प्रशासन व स्थानिक ख्रिस्ती समाजाच्या वतीने या कारवाईला विरोध दर्शवण्यात आला असून, या प्रसंगी प्रिंट व डिजिटल माध्यमांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
चर्च पाडण्यात येणार असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव, महिला वर्ग तसेच विविध स्तरांतील नागरिक घटनास्थळी एकत्र जमले. नागरिकांनी शांततापूर्ण मार्गाने या कारवाईचा निषेध नोंदवत चर्चला पाठिंबा दर्शविला.
या वेळी अॅड. तोसिफ शेख यांनी चर्चच्या वतीने कायदेशीर बाजू मांडली. तसेच पास्टर रॉबिन महाडकर, पास्टर सुहास गायकवाड व पास्टर संदीप गायकवाड यांच्या उपस्थितीत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याशी चर्चा करण्यात आली.
या चर्चेनंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून सकारात्मक प्रतिसाद देत सदर पाडकामाच्या कारवाईस सोमवारपर्यंत तात्पुरती स्थगिती (stay) देण्यात आली आहे.
दरम्यान, काही नागरिकांनी ही कारवाई अल्पसंख्याक समाजावर अन्यायकारक असल्याचा आरोप केला असून, प्रशासनाने न्याय्य व कायदेशीर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
“आजची लढाई आपल्या ख्रिस्ती बांधवांसाठी होती. सर्वांच्या एकजुटीमुळेच ही कारवाई थांबवता आली,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली.
घटनेमुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुढील निर्णय सोमवारनंतर घेतला जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.









