लोणी काळभोर येथील ग्राम महसूल अधिकारी निलंबित; कर्तव्यात हलगर्जीपणाचा ठपका
लोणी काळभोर : कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून लोणी काळभोर येथील ग्राम महसूल अधिकारी बालासाहेब श्रीपती वनवे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ८ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय लोणी काळभोर यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. कर्तव्यात असताना गंभीर हलगर्जीपणा झाल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
निलंबनाच्या काळात बालासाहेब वनवे यांचे मुख्यालय तहसील कार्यालय जुन्नर येथे निश्चित करण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय निलंबनाच्या कालावधीत वनवे यांनी कोणतीही खासगी नोकरी स्वीकारू नये किंवा कोणताही व्यवसाय करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नियमांनुसार निलंबन काळात त्यांना निर्वाहभत्ता व इतर पूरक भत्ते देण्यात येणार आहेत. मात्र प्रत्येक वेळी भत्ता घेण्यापूर्वी त्यांनी कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
दरम्यान, तहसीलदार लोणी काळभोर यांनी वनवे यांच्या कामकाजाची तपासणी करून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ८ नुसार विभागीय चौकशीचा प्रस्ताव एक महिन्याच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.









