अॅड. तोसिफ शेख यांच्या पाठपुराव्यानंतर कोंढवा पोलिसांची कारवाई; मृत कामगाराच्या कुटुंबाला न्यायाची आशा
पुणे, दि. २४ जुलै २०२६ : कोंढवा खुर्द येथील अश्रफ नगर, जुनैदी चौक परिसरातील फिरदोस अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये १७ जुलै २०२६ रोजी लागलेल्या भीषण आगीत वेल्डिंगचे काम करणाऱ्या एका फॅब्रिकेशन कामगाराचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या प्रकरणात महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. अॅड. तोसिफ शेख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
एफआयआरनुसार, हा गुन्हा भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम १०५, २८७, ३२६ आणि ३(५) अन्वये नोंदविण्यात आला असून, इमारतीचे मालक रझा खान आणि गोदाम मालक जहांगीर अन्सारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा २३ जुलै २०२६ रोजी रात्री १०:१८ वाजता कोंढवा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्याची नोंद एफआयआरमध्ये आहे.
तक्रारीनुसार, संबंधित बेसमेंटमध्ये थिनर, हार्डनर, ऑइल पेंट, टर्पेन्टाईनसह इतर ज्वलनशील व धोकादायक रासायनिक पदार्थ आवश्यक परवानग्या न घेता बेकायदेशीररीत्या साठवून ठेवण्यात आले होते. तसेच, अग्निसुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले नव्हते आणि बेसमेंटचा वापर नियमबाह्य व्यावसायिक कामकाजासाठी केला जात होता.
घटनेनंतर मृत कामगाराच्या कुटुंबीयांनी त्याच्या ठावठिकाण्याबाबत वारंवार विचारणा केली असता, बेसमेंटमध्ये कोणीही अडकल्याचे नाकारण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलीस व अग्निशमन दलाचे बचावकार्य उशिरा सुरू झाले. आग आटोक्यात आल्यानंतर पोलिसांनी बेसमेंटमध्ये प्रवेश केला असता, तेथे कामगाराचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
तसेच, इमारतीचे कथित अनधिकृत बांधकाम आणि अडथळायुक्त प्रवेशमार्ग यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यास अडचणी आल्याने बचावकार्यात विलंब झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर मृत कामगाराच्या पत्नीने न्यायासाठी अॅड. तोसिफ शेख यांच्याकडे कायदेशीर मदत मागितली. प्रकरणातील सर्व बाबींचा अभ्यास करून आणि पोलीस प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अॅड. तोसिफ शेख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “निष्काळजीपणा, धोकादायक ज्वलनशील पदार्थांचा बेकायदेशीर साठा आणि अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव जाणे ही केवळ अपघाताची घटना नाही. यासाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी.”
या कारवाईमुळे मृत कामगाराच्या कुटुंबीयांमध्ये न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली असून, पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.









