पुणे महापालिकेतील १० नगरसेवक अडचणीत; अनधिकृत बांधकाम प्रकरणी अपात्रतेची टांगती तलवार!
पुणे:
पुणे महानगरपालिकेतील तब्बल १० नवनिर्वाचित
नगरसेवकांवर अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींमुळे अपात्रतेची टांगती तलवार आली आहे. या सर्व नगरसेवकांच्या अनधिकृत बांधकामांसंबंधीच्या तक्रारींची प्राथमिक चौकशी शहर अभियंता विभागाने केली असता, संबंधित नगरसेवकांनी केलेल्या बांधकामांची महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
या प्राथमिक चौकशीनंतर निवडणूक कार्यालयाने अंतिम सुनावणीचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर केला आहे.
हे १० नगरसेवक आहेत रडारवर:
चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले हे नगरसेवक सर्वपक्षीय असून यामध्ये प्रामुख्याने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा समावेश आहे. रडारवर असलेल्या नगरसेवकांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. व्यंकोजी खोपडे
२. वैशाली बनकर
३. सुरेखा कवडे
४. शीतल सावंत
५. काशिफ फखरूल हसन अली सय्यद
६. संगीता दांगट
७. रेखा टिंगरे
८. स्मिता कोंढरे
९. प्राची आल्हाट
१०. नंदा आबनावे
‘या’ कलमांतर्गत होणार कारवाई:
महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम १० (ड) अंतर्गत या नगरसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कायदेशीर तरतुदीनुसार, निवडणूक लढवण्यापूर्वी किंवा निवडून आल्यानंतर केलेले अनधिकृत बांधकाम हे थेट अपात्रतेचे कारण ठरू शकते.
सुनावणीचा पहिला टप्पा पूर्ण:
निवडणूक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात ५ नगरसेवकांचे अहवाल अंतिम सुनावणीसाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. यापैकी ४ नगरसेवकांची पहिली सुनावणी प्रक्रिया पार पडली असून, काही नगरसेवकांनी पुढील वेळ मागून घेतली आहे.
उर्वरित नगरसेवकांच्या अनधिकृत बांधकामाबाबत शहर अभियंता विभागाकडून अंतिम अहवाल मागवण्यात आला असून, तो प्राप्त होताच पुढील कारवाईची कुऱ्हाड कोसळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. सध्या या सर्व प्रकरणांमुळे पुणे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित नगरसेवकांच्या भवितव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









