. सुनील मानेवर ‘ॲट्रॉसिटी’ दाखल करा; दलित पॅंथरचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालया समोर तीव्र आंदोलन!!
पुणे: (प्रतिनिधी, शंकर जोग)
एका पीडित महिलेवर अत्याचार, बलात्कार करून खंडणी मागणाऱ्या आणि तिला बेदम मारहाण करणाऱ्या आरोपी ॲड. सुनील माने याच्यावर कठोर कारवाई करून ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी दलित पॅंथरच्या वतीने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर गुरुवारी जोरदार निदर्शने करण्यात आली.
नेमके प्रकरण काय? आरोपी ॲड. सुनील माने याने पिंपरी-चिंचवडमधील एका पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. तसेच, तिची फसवणूक करून खंडणी मागितली आणि जातीवाचक शिवीगाळ करत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या धक्कादायक प्रकारामुळे शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दलित पॅंथरचा इशारा पीडित महिलेला न्याय मिळावा आणि या गुन्ह्यातील फरार आरोपींना तात्काळ अटक व्हावी, या मागणीसाठी दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष: मा.यशवंत भाऊ नडगम आणि प्रदेशाध्यक्ष आबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
“पीडित महिलेला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे. जर प्रशासनाने या प्रकरणात दिरंगाई केली आणि आरोपींना पाठीशी घातले, तर दलित पॅंथरच्या वतीने संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांनी यावेळी दिला.
आंदोलनातील प्रमुख मागण्या: आरोपी ॲड. सुनील माने याच्यावर तत्काळ ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा.
फरार असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी.
पीडित महिलेला आणि तिच्या कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण मिळावे.
या आंदोलनात प्रदेश कार्याध्यक्ष सोमनाथ साळवे, पुणे संपर्कप्रमुख बंडू गवळी, पुणे शहर युवती अध्यक्षा लक्ष्मी गायकवाड, पुणे शहर युवक अध्यक्ष कुणाल साठे, रोहित कांबळे, सुनील अगरे, कविता डाडर, अजय वंदिले, प्रियंका खरात, पुणे जिल्हा अध्यक्ष मा.मिलिंद सरवदे, अजिंक्य म्हस्के, माऊली गरुड, विक्रम पवार, विक्रम गरुड, रेखाताई सूर्यवंशी, अनुराधा अवघडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.









