पिंपरी-चिंचवडमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टँड’चे दिमाखदार उद्घाटन
पिंपरी-चिंचवड: मोरया हॉस्पिटल, आंबेडकर चौक येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टँड’चे उद्घाटन नगरसेवक आनंद कोराळे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबा कांबळे होते.
उद्घाटनप्रसंगी नगरसेवक आनंद कोराळे यांनी रिक्षा चालकांच्या शहर वाहतुकीतील योगदानाचे कौतुक करत रिक्षा स्टँडवर पिण्याच्या पाण्याची सोय (पाणपोई) व वाचनालय उभारण्याचे आश्वासन दिले.
“संघटना नव्हे, हा एक परिवार आहे” – डॉ. बाबा कांबळे
अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबा कांबळे यांनी सांगितले की, महाराष्ट्र रिक्षा पंचायत ही २००६ पासून राज्यभर कार्यरत असून ८ जिल्ह्यांत स्वतःची कार्यालये आहेत. “ही केवळ संघटना नसून रिक्षा चालकांचा परिवार आहे,” असे ते म्हणाले.१९९७ आणि २०१७ मध्ये सुरू झालेल्या मुक्त रिक्षा परवाना धोरणामुळे २०१७ ते २०२६ या कालावधीत शहरातील रिक्षांची संख्या ५०,००० च्या पुढे गेली आहे. त्यामुळे रिक्षा चालकांपुढे उदरनिर्वाहाचे गंभीर संकट उभे राहिले आहे. मुक्त परवाना पद्धत बंद करून ई-रिक्षांना परमिटच्या कक्षेत आणण्याची मागणी त्यांनी केली.
महत्त्वाच्या मागण्या : सीएनजी बाटली टेस्टिंग शुल्क कपात: ३,००० रुपयांवर गेलेले शुल्क पुन्हा ५०० रुपयांवर आणावे.
कल्याणकारी मंडळ स्थापन करावे: रिक्षा चालकांना पेन्शन, त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती व सुलभ कर्ज सुविधा द्यावी.
अवैध वाहतुकी विरोधात लढा: ओला कॅब्स, उबर आणि रॅपिडो यांच्या टू-व्हीलर टॅक्सी सेवां विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
उपस्थित मान्यवर
यावेळी युवक अध्यक्ष शुभम तांदळे, पुणे जिल्हाध्यक्ष संतोष गुंड, कार्याध्यक्ष जाफरभाई शेख, रिक्षा ब्रिगेड प्रमुख अनिल शिरसाट, विद्यार्थी वाहतूक विभाग अध्यक्ष प्रदीप आहेर, विशाल ससाने, पप्पू वाल्मिकी, नंदू शेठ शेळके, संदीप कुरुंद, उमाकांत शिंदे, शिवाजीराव सोनवणे, राजेंद्र चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सोमनाथ टिकोणे, उपाध्यक्ष संतोष सावंत, कार्याध्यक्ष अरुण कांबळे, सचिव अशोक जगताप तसेच सर्व रिक्षा चालक बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.









